Nashik Trimbakeshwar : पहिणे बारीत पर्यटकांची उसळली गर्दी, निसर्ग सहलीला आलेल्या वाहनांनी रस्ता व्यापला | पुढारी

Nashik Trimbakeshwar : पहिणे बारीत पर्यटकांची उसळली गर्दी, निसर्ग सहलीला आलेल्या वाहनांनी रस्ता व्यापला

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक)

रविवारी (दि.9) दिवसभर ञ्यंबकेश्वर जवळच्या पहिणे बारीत पर्यटकांची गर्दी उसळली होती. निसर्ग सहलीला आलेल्या वाहनांनी रस्ता व्यापल्याने मुंबई घोटीकडे जाणाऱ्या प्रवाशांची वारंवार कोंडी झालेली पाहावयास मिळाली. नाशिक-ञ्यंबक रस्त्यालाही वाहनांची संख्या नेहमीपेक्षा दहा ते वीस पटीने अधिक होती.

पहिणे, तोरंगण घाट, दुगारवाडी, हरिहर, ब्रह्मगिरी, अंजनेरी येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी रस्ता फुलला होता. शनिवारी (दि. 8) जोरदार पाऊस झाला. रविवारीही पाऊस झाल्यामुळे धबधबे खळाळत होते. रविवारी अधूनमधून उघडीप दिल्याने पर्यटकांच्या उत्साहाला उधाण आले होते. पहिणे येथे शनिवारी एका दिवसात 2083 पर्यटक  पाहण्यासाठी 30 रुपयांचे तिकीट काढून गेले, तर रविवारी ही संख्या सायंकाळपर्यंत चार हजारांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. तरुणाईची संख्या लक्षणीय होती तसेच मध्यमवयीन व वयोवृद्ध पर्यटकही मोठ्या संख्येने आलेले होते. दुपारनंतर गर्दी वाढलेली होती.

मक्याचे कणीस आणि इतर खाद्यपदार्थ यांची जोरदार विक्री झाल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. त्र्यंबक पोलिसांनी पेगलवाडी फाटा येथे काही काळ नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे, उपनिरीक्षक अश्विनी टिळे, आर. एल. जगताप, सचिन गवळी, रूपेश मुळाणे यांसह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button