मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा | पुढारी

मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आम्ही भाजपला म्हणणार नाही की, त्यांनी आम्हाला काही द्यावे. त्यांनी आम्हाला जागा द्याव्यात, मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, अन्यथा आमचे हेलिकॉप्टर जर लॅण्ड झाले, तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, अशा शब्दांत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला इशारा दिला. भाजपला मित्र पक्षाची गरज असली, तरी त्यांनीच मित्र पक्षांची वाट लावली आहे. त्यामुळे आमची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले.

कामटवाडे येथील मथुरा लॉन्समध्ये सोमवारी (दि. २६) जानकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. जानकर म्हणाले, आम्ही भाजपसोबत आहोत. आम्हाला विधानसभेला, लोकसभेला जागा मिळाली नाही. आम्ही बंडखोरी करून शेवटी आमचा आमदार निवडून आणला. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार सांगणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला सोबत घेतले नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डांबरीकरण, तर दुसऱ्या बाजुला राहुल गांधी यांचे काँक्रिटीकरण आहे. मी मध्ये माझा छोटासा मार्ग काढत आहे. मी इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल वागतो. ज्याच्यामागे लोक आहेत, त्याला सोडायचे अन् ज्याच्यामागे कुणीही नाही, त्याला घ्यायचे हे भाजपचे धोरण आहे. त्यांना कपालेश्वर बुद्धी देवो, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली. भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. त्यांच्यावर आम्ही नाराज नाही, रागदेखील नाही. मी स्वतःला सांगतो की, महादेव जानकर स्वतःला मोठा कर. त्यावेळी मीडियादेखील मागे येईल, असा आशावाद त्यांनी बोलून दाखवला आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएस पक्षाकडून ऑफर आल्याच्या चर्चांवर जानकर म्हणाले, पंकजाताई माझी बहीण आहे. त्या एका पक्षाच्या सचिव असून हुशार आहेत. याबाबत त्या स्वतः योग्य तो निर्णय घेतील. मी त्यांना सल्ला देण्याइतपत मोठा नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बीआरएस पक्षाबाबत, कुठल्याही पक्षाला लोकशाहीत अधिकार असून, जनता ही जनार्दन आहे. जनता ठरवेल, बीआरएस पक्षाचे शेतकरी धोरण चांगले आहे. आपल्याशी अजून काही त्यांनी चर्चा केली नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button