New York Diwali Holiday : आता अमेरिकेतील शाळांनाही असणार दिवाळीची सुट्टी | पुढारी

New York Diwali Holiday : आता अमेरिकेतील शाळांनाही असणार दिवाळीची सुट्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या संस्कृतीला महत्त्व देत येथील प्रशासनाने शाळांच्या सार्वजनिक सुट्टीच्या यादीत दिवाळीचा समावेश केला आहे. न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी सोमवारी ही घोषणा केली. शहरातील दक्षिण आशियाई आणि भारतीय कॅरेबियन समुदायाची संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यंदा दिवाळी रविवारी आली आहे.

महापौर एरिक अॅडम्स यांनी सोमवारी सुट्टीची माहिती ट्विट केली. एरिक यांनी सांगितले की, यावर्षीपासून दिवाळीला न्यूयॉर्क शहरातील शाळांना सुट्टी असेल. तुम्ही या शहराचा एक भाग आहात. तुम्हाला बाहेरचे मानले जाणार नाही. न्यूयॉर्क सर्वांसाठी आहे. तुम्ही कुठून आलात याची आम्हाला पर्वा नाही. विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार यांच्यासह इतर समाजाच्या नेत्यांनी मला दिवाळीच्या सुट्टीच्या निर्णयात मदत केली असल्याचे सांगत त्यांनी आताच दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

न्यूयॉर्क विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार यांनी ट्विट करून लोकांना शुभेच्छा दिल्या. नवीन कायद्यासाठी महापौरांसह लढा देणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या विधेयकावर राज्यपाल कॅथी हॉचुल यांची स्वाक्षरी झालेली नाही. परंतु महापौर यांनी मात्र राज्यपाल या विधेयकावर स्वाक्षरी करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Back to top button