नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई | पुढारी

नाशिक : ब्लॅकने विक्री होत असलेला गहू तांदूळ जप्त ; देवळा पोलिसांची कारवाई

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

उमराणे येथे मुंबई आग्रा महामार्गावर शासकीय गोदामातील रेशनचा गहू व तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे वाहन देवळा पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी दोन आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईमध्ये जवळपास ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल देवळा पोलिसांनी जप्त केला आहे.

याबात देवळा पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार बुधवारी (दि.१४) उमराणे ता. देवळा येथील मुंबई आग्रा महामार्गावर एका ट्रकमध्ये (एम एच १२/एफ सी ५८४४) ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे सुमारे २४६ गोणी (प्रत्येकी ५० किलो) तांदूळ व ३७ हजार ५०० रुपये किमतीचे सुमारे ३० गोणी गहू (प्रत्येकी ५० किलो) याप्रमाणे शासकीय गोदामातील गहू व तांदूळ आढळून आले. हे धान्य अवैध मार्गाने काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती देवळा पोलिसांना मिळून आली. याबाबत देवळा येथील पुरवठा निरीक्षक ज्योती कपाले यांनी आरोपी विजय देवरे (रा. उमराणे, मनमाड रोड) व योगेश माणिक भामरे (३२, ट्रकचालक, रा. खुंटेवाडी ता. देवळा) यांच्या विरोधात फिर्याद दाखल करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकूण ११ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल देवळा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे व सहकारी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button