नाशिक : त्या हल्ल्यानंतर पोलिस ॲक्टिव्ह मोडवर; एकाच दिवसात ६६ अवैध धंद्यांवर कारवाई | पुढारी

नाशिक : त्या हल्ल्यानंतर पोलिस ॲक्टिव्ह मोडवर; एकाच दिवसात ६६ अवैध धंद्यांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण भागात चोरट्या पद्धतीने सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. गुरुवारी (दि. १) पहाटेच्या सुमारास ५५० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने जिल्ह्यातील ६६ ठिकाणी एकाच वेळी कारवाई करून ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे बुधवारी (दि. 31) कारवाई करताना अवैध धंदेचालकांनी थेट पोलिसांवरच हल्ला केल्याने ग्रामीण पोलिस ॲक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसत आहे.

अवैध हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी दि. २५ मे रोजी ४६ ठिकाणी छापे टाकून १० लाख रुपयांची गावठी दारू, रसायन व इतर सामग्री जप्त केली होती. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार ३४ गुन्हे दाखल केले आहे. त्यानंतरही ग्रामीण भागात हातभट्टी अड्डे सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांना समजले. त्यामुळे पुन्हा पोलिस ठाणेनिहाय पोलिस पथके तयार करून गुरुवारी पहाटेच कारवाई केली. यात सटाण्यामधील ७, कळवणमधील ५, वाडीवऱ्हे, घोटी, जायखेडा येथील प्रत्येकी ४, देवळा, इगतपुरी, सिन्नर एमआयडीसी व सिन्नरमधील प्रत्येकी २ व पेठमधील १ अशा एकूण ६६ अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत रसायन तयार करण्यासाठी लागणाऱ्या गूळ विक्रेत्यांवरही कारवाई केली. डोंगर, दऱ्या नदी-नाल्यांलगत असलेल्या गावांमध्ये गावठी दारू हातभट्ट्यांवर छापे टाकत मुद्देमाल सील केला. अपर पोलिस अधीक्षक माधुरी केदार- कांगणे, मालेगावचे अपर अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह सहायक अधीक्षक तेगबीरसिंह संधू, उपविभागीय अधिकारी प्रदीप जाधव, पुष्कराज सूर्यवंशी, कविता फडतरे, ३८ पोलिस ठाण्याचे प्रभारी, दुय्यम अधिकारी, अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, १२ विशेष पथकांनी छापा कारवाईत सहभाग घेतला होता.

अवैध धंद्यांची माहिती असल्यास नागरिकांनी ६२६२२५६३६३ या हेल्पलाइनवर माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले आहे. गावठी दारू तयार करण्यासाठी नाल्यातील पाणी, नवसागर, बॅटरीचे जुने सेल, युरिया यांसह मानवी जीवनास अपायकारक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. तर, छापा कारवाईत देवळ्यातील चिंचवे गावातील पाझर तलावाच्या काठावर लोखंडी पाइप फॅन व बॅटरीच्या साहाय्याने भट्टीला अतिरिक्त हवा देण्याचे हॅण्डमेड ब्लोअर हस्तगत करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button