कोल्हापूर लोकसभा मतदार संघात उमेदवारांपेक्षा स्थानिक नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विधानसभेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. कोल्हापुरात सरळ लढत आहे. आता पक्ष फुटल्यामुळे प्रत्येक इच्छुकाला कुठे ना कुठे उमेदवारीसाठी स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेत ताकद आजमावून त्याद्वारे विधानसभेसाठी आखाड्यात उतरण्याची तयारी अनेकांनी केली आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. एरवी गोकुळ दूध संघाची सत्ता एकमुखी एका उमेदवारामागे राबायची. यंदा त्यामध्येही दुफळी झाली आहे, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातही याची लागण झाली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार शिंदे शिवसेनेचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज यांच्यात सरळ लढत होत आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शाहू महाराज यांच्या उमेदवारीमागे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील यांची भक्कम फौज कार्यरत आहे. दोन्ही पाटील कुटुंबीय आपणच उमेदवार असल्याप्रमाणे शाहू महाराज यांच्यासाठी मोठ्या ईर्ष्येने घर आणि घर पिंजून काढत आहेत. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक हे मंडलिक यांच्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत.
'उत्तर'मध्ये चुरस
कोल्हापूर उत्तर मतदार संघात शाहू महाराज यांच्यामागे राष्ट्रवादीचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते राबत आहेत. तर मंडलिक यांच्यामागे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आदिल फरास, भाजपचे सत्यजित कदम, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे राबत आहेत. विद्यमान आमदार काँग्रेसच्या जयश्री जाधव प्रचारात सक्रिय आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने ही जागाही कायम राखल्याने महायुतीला ताकद पणाला लावावी लागत आहे. संभाजीराजे व मालोजीराजे यांनी घर ते घर संपर्क मोहीम पूर्ण करत आणली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जाधव यांना 97 हजार 322, तर भाजपचे सत्यजित कदम यांना 78 हजार 25 मते मिळाली होती.
'दक्षिण'मध्ये काटाजोड
कोल्हापूर दक्षिणमध्ये निवडणूक लोकसभेची आहे की विधानसभेची, हेच समजू नये, अशी परिस्थिती आहे. येथे पाटील व महाडिक गट थेट परस्परांना भिडले आहेत. आमदार ऋतुराज पाटील शाहू महाराज यांच्यासाठी, तर माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक मंडलिक यांच्या प्रचारासाठी जिवाचे रान करत आहेत. मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. विधानसभेला ऋतुराज पाटील यांना 1 लाख 40 हजार 103, तर भाजपचे अमल महाडिक यांना 97 हजार 394 मते मिळाली होती.
पी. एन. – नरके ताकदीने प्रचारात
करवीर मतदार संघात काँगेस विरुद्ध शिंदे शिवसेना अशी विधानसभेची सेमीफायनल आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार पी. एन. पाटील यांनी स्वत:च्या विधानसभेपेक्षा लोकसभेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. संपूर्ण लोकसभा मतदार संघात शाहू महाराज यांना आपल्या मतदार संघाचे मताधिक्य एवढे असेल की, हे लीड तोडताना विरोधकांची दमछाक होईल, असे पाटील ठामपणे सांगत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंबीय या प्रचारात सक्रिय आहे. महिला मेळाव्यांच्या माध्यमातून राहुल पाटील यांच्या पत्नीने राजकीय व्यासपीठावर धमाकेदार एंट्री केली आहे. त्यांचे पारंपरिक विरोधक शिंदे शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांनीही मंडलिक यांच्या प्रचारासाठी कसूर केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेवेळी आपल्या समर्थकांसह हजेरी लावून त्यांनी आपण कोठे कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. येथे माजी आमदार संपतराव पवार-पाटील, क्रांतिसिंह पवार-पाटील यांच्यासह भोगावती साखर कारखान्याची सगळी ताकद शाहू महाराज यांच्यामागे आहे, तर कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याची ताकद मंडलिक यांच्यामागे उभी आहे. मात्र, गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा दिल्याने नरके गटात दोन मतप्रवाह स्पष्ट झाले आहेत. करवीर मतदार संघातून काँग्रेसचे पी. एन. पाटील विजयी झाले आहेत. त्यांना 1 लाख 35 हजार 675 मते मिळाली, तर शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांना 1 लाख 13 हजार 14 मते मिळाली होती.
'कागल'मध्ये अंतर्गत धुसफुस कोणाला भोवणार?
जिल्ह्याच्या कागल या राजकीय विद्यापीठात तीन विरुद्ध एक असा वरवरचा सामना असला, तरीही अंतर्गत गटबाजीतून परस्परांवर शेवटच्या क्षणाला होणार्या कुरघोड्या कोणाला मदत करणार, हे निकालातच स्पष्ट होईल. हसन मुश्रीफ, संजय मंडलिक व समरजित घाटगे हे तीन गट मंडलिक यांच्यासमवेत आहेत. तर माजी आमदार संजय घाटगे ताकदीनेे शाहू महाराज यांच्यासाठी प्रचार करत आहेत. शाहू, मंडलिक व संताजी घोरपडे हे तीन साखर कारखाने मंडलिक यांच्यामागे ठाम आहेत. तर संजय घाटगे यांच्या अन्नपूर्णा समूहाची ताकद शाहू महाराज यांच्यामागे आहे. ब्रिदी कारखानाही मंडलिक यांच्यामागे आहे. त्याचे काही सभासद या तालुक्यात आहेत. मात्र, बिद्रीचे नेते मंडलिक यांच्यामागे असले, तरी संजय मंडलिक यांनी बिद्री कारखान्यात केलेले स्वतंत्र पॅनेल व त्या माध्यमातून केलेली वक्तव्ये ताजी असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे त्याबाबत आपली नाराजी बोलून दाखविल्याची चर्चा आहे. रामनवमीला कागलमध्ये कमालीचे महत्त्व आहे. रामनवमीच्या सोहळ्यात मालोजीराजे यांची उपस्थिती होती, तर प्रवीणसिंह घाटगे हे शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते. मात्र, समरजित घाटगे यांनी मंडलिक यांच्या प्रचारात आघाडी कायम ठेवली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ विजयी झाले आहेत. त्यांना 1 लाख 16 हजार 436 मते मिळाली, तर अपक्ष समरजित घाटगे यांना 88 हजार 303 मते मिळाली.
'चंदगड'ला नेते भरपूर;ताकद विभागली
चंदगडला राजकीय ताकद विभागली आहे. तेथे राजेश पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. ते महायुतीकडे आहेत. मंडलिक यांचे ते मेहुणे आहेत. त्यांच्यासह माजी राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. तर काँग्रेसचे गोपाळराव पाटील, कुपेकर गटासह नंदिनी बाभूळकर, जनता दलाच्या स्वाती कोरी महाविकास आघाडीत आहेत. आजरा तालुक्यात सुधीर देसाई गट अजित पवार राष्ट्रवादी, अशोक चराटी गट भाजप म्हणजे महायुती, तर सुनील शिंत्रे ठाकरे शिवसेनेकडे आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेश पाटील हे 55 हजार 558 मते मिळवून विजयी झाले, तर अपक्ष शिवाजी पाटील यांना 51 हजार 173 मते मिळाली होती. शिवाजी पाटील भाजपकडे, तर विनायक पाटील काँग्रेसकडे आहेत.
'बिद्री'चे कवित्व कायम
राधानगरी, भुदरगडला वेगळाच सामना पाहायला मिळत आहे. तेथे शिंदे शिवसेनेचे प्रकाश आबिटकर महायुतीच्या प्रचारात आहेत. त्यांचे राजकीय विरोधक तसेत ब्रिद्री कारखान्यातीलही विरोधक माजी आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे के. पी. पाटील हे आता हातात हात घालून मंडलिक यांच्या प्रचारासाठी झटत आहेत. तर के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील आता आबिटकर यांची साथ सोडून काँग्रेसबरोबर आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे महायुतीत आहेत. येथे सतेज पाटील यांची मौनी विद्यापीठाच्या माध्यमातून ताकद आहे. सत्यजित जाधव, जीवन पाटील, आबिटकर गटाचे गोकुळ संचालक अभिजित तायशेटे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, शेकापचे एकनाथराव पाटील हे काँग्रेस प्रचारात आहेत, तर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, प्रा. किसनराव चौगले हे मंडलिक यांच्या प्रचारात आहेत. पक्षापेक्षा गटातटांची ताकद आणि नुकत्याच झालेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीचे कवित्व या निवडणुकीत उमटल्यास त्याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, अशी परिस्थिती आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे 1 लाख 5 हजार 889 मते मिळवून विजयी झाले, तर राष्ट्रवादीचे के. पी. पाटील यांना 87 हजार 451 मते मिळाली होती.