पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) आयपीएल २०२४ च्या ५३ व्या सामन्यात फलंदाजी केली नाही, परंतु त्याने एक विशेष कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासात १५० झेल घेणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. धोनीने पंजाबविरुद्ध जितेश शर्माचा झेल घेत हा खास टप्पा गाठला.
महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) यष्टिरक्षक म्हणून १४६ आणि क्षेत्ररक्षक म्हणून ४ झेल घेतले आहेत. या बाबतीत दिनेश कार्तिक १४४ झेलांसह दुसऱ्या स्थानावर असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स ११८ झेलांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली ११३ झेलांसह चौथ्या स्थानावर आहे.
धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाने २० षटकात ९ गडी गमावून १६७ धावा केल्या. कर्णधार रुतुराज गायकवाडने आतापर्यंत ११ सामन्यांत १० वेळा नाणेफेक गमावली आहे. या सामन्यात धोनी (MS Dhoni) नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. आयपीएलच्या इतिहासात आणि त्याच्या १८ वर्षांच्या टी-२० कारकिर्दीत माही नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, हर्षल पटेलच्या पहिल्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. धोनीच नाही तर पंजाबचा यष्टिरक्षक जितेश शर्माही खाते उघडू शकला नाही. आयपीएलच्या इतिहासात ही पाचवी वेळ आहे जेव्हा दोन्ही संघांचे यष्टीरक्षक एका सामन्यात खातेही उघडू शकले नाहीत. जितेशला सिमरजीत सिंगने धोनीच्या हाती झेलबाद केले.
अपयशापासून धडा घेऊन पुढे जातो. मी कधीही तणावात खेळत नाही, असे मत महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले आहे. क्रिकबझ या वेबसाईटशी बोलताना धोनी म्हणाला, पराभवानंतर तणावात खेळलो तर माझे वैयक्तिक आणि संघाचेही नुकसान होते. त्यामुळे मी डगमगत नाही. आयुष्यात आपण नेहमी काहीतरी शिकत पुढे गेले पाहिजे. हे करताना एकदा झालेली चूक दुसऱ्यांदा होणार नाही, याची कटाक्षाने काळजीही घेता आली पाहिजे. भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. मलापण राग येतो. मीदेखील कधी कधी हताश होतो, निराश होतो. पण, वर्तमानात जगत असताना मला या क्षणाला काय करायचे आहे याचा विचार करून मी कृतीला महत्त्व देतो, असे तो म्हणाला.
हेही वाचा :