मशीद पाडण्यावरून चीनमध्ये मुस्लिमांची पोलिसांवर दगडफेक : अनेक जखमी | पुढारी

मशीद पाडण्यावरून चीनमध्ये मुस्लिमांची पोलिसांवर दगडफेक : अनेक जखमी

बीजिंग, वृत्तसंस्था : चीनच्या युनान प्रांतातील 14 व्या शतकातील मशीद पाडण्याचे काम चिनी प्रशासनाने हाती घेतले असून यावरून हुई मुस्लिमांच्या हजारोंच्या जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. त्यात अनेक जण जखमी झाले. मशीद पाडण्यावरून तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला असून मुस्लिमांनी मशिदीतच ठिय्या दिला आहे.

युनान प्रांतातील नाजियिंग गावात हुई मुस्लिम समुदायाची एक जुनी मशीद आहे. 14 व्या शतकातील या मशिदीला लागूनच करण्यात आलेले बांधकाम अनधिकृत असल्याचे चिनी प्रशासनाचे म्हणणे असून त्यांनी हे पाडण्याची मोहीम हाती घेतली. कडक पोलिस बंदोबस्तात ही मोहीम सुरू झाल्यावर मुस्लिमांनी या पथकावर जोरदार दगडफेक केली व मशिदीच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखणार्‍या पोलिसांनाही यात दगड-विटांचा मारा सहन करावा लागला. या दगडफेकीत 12 पोलिस जखमी झाल्याचे सांगण्यात येते.

चिनी प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती दिली नसली तरी, प्रत्यक्षदर्शींनी समाज माध्यमांवर दिलेल्या माहितीवरून कळते की, बांधकाम पाडण्यासाठी आलेले पथक काम सुरू करत असतानाच हजारो महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि मुले त्यांच्यावर चाल करून गेले. असा काही प्रकार होईल याचा प्रशासनाला अंदाज असल्याने एक हजार पोलिसांची तुकडी तयार ठेवण्यात आली होती. त्यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांची लाठीमाराला सुरुवात

दुपारी एकच्या सुमारास या जमावाने नमाजाची वेळ झाल्याने आत नमाजसाठी जाऊद्या अशी मागणी केल्यावर तेथे रेटारेटी सुरू झाली. जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करायला सुरुवात केली. त्याला उत्तर देण्यासाठी जमावाने दगडफेक सुरू केली. यात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. अखेर ही मोहीम थांबवण्यात आली व पथक माघारी फिरले. पण स्थानिकांनी पथक पुन्हा येईल या भीतीने मशिदीतच तळ ठोकला असून ते पहारा देत आहेत.

Back to top button