आमदार खोसकरांचे आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र : माजी सभापती शिवाजी चुंभळे | पुढारी

आमदार खोसकरांचे आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र : माजी सभापती शिवाजी चुंभळे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी खंडन केले असून बाजार समितीच्या निवडणुकीमुळे पिंगळे गटाकडून हे राजकीय षडयंत्र केले जात असल्याचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी म्हटले आहे.

नाशिकमध्ये १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून, गुरुवारी माघारीची अंतिम मुदत संपल्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे शुक्रवारी चिन्ह वाटप व याद्या जाहीर झाल्याने निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहे. नाशिक कृषी बाजार समितीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना (शिंदे गट) असे चित्र दिसत असले तरी खरी पिंगळे गट विरुद्ध चुंभळे गट अशी पारंपरिक लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी दोन्ही ही गट सोडतांना दिसत नाही.

इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी शुक्रवार (दि. २२) रोजी नाशिक तालुका पोलिस ठाणे गाठत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे व त्यांचे पुत्र अजिंक्य चूंभळे यांनी मोबाइलवरून धमकी दिल्याबाबत अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली. यात त्यांनी “मतदारसंघात फिरू नको, माझ्या बापाच्या नादी लागू नको, तू अजून आम्हाला ओळखले नाही. आमच्या नादी लागल्यावर काय परिणाम भोगावे लागतील, याचा विचार कर” अशा पद्धतीने वेळोवेळी धमकी दिली जात असल्याचे आमदार खोसकर यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी, आमदार खोसकर यांनी केलेले आरोपाचे खंडन करीत, आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले. तसेच माझ्या मुलाने आमदारांना फोन केला होता. जे बोलणं झालं त्याची क्लिप आमच्याकडे असून ती आम्ही पोलीसांना दाखविली व ऐकवली आहे.

इगतपुरी मतदार संघात आमचे देखील नातेगोते आहे. आम्ही देखील आमदारांना निवडणुक काळात मदत केली आहे. माजी सभापती देविदास पिंगळे यांनी आमदार खोसकर यांना खोटा आरोप करावयास सांगितले असल्याचे चुंभळे म्हणाले. तसेच माझा मुलगा अजिंक्य दोन वेळा खोसकरांशी फोनवर बोलला आहे त्याची क्लिप आम्ही ऐकविण्यास तयार होत.

हेही वाचा :

Back to top button