पैठण बाजार समिती निवडणूक : आक्षेपार्ह टीका केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थकांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण | पुढारी

पैठण बाजार समिती निवडणूक : आक्षेपार्ह टीका केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी समर्थकांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमात आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने अपक्ष उमेदवार बाबासाहेब नारायण पवार यांना काँग्रेस व राष्ट्रवादी समर्थकांकडून मारहाण करण्यात आली. आज (दि.२२) पवार यांच्या इंदेगाव येथील प्रचार नारळ फोडण्याच्या कार्यक्रमात ही घटना घडली.

पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. वेगवेगळ्या पक्षातील उमेदवारांनी प्रचार नारळ फोडण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब पवार यांनी इंदेगाव येथे प्रचार नारळ फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे यांना “काळा उंदीर” व राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी पक्षाचा गैरवापर करून आपल्या मुलाला उमेदवारी देण्याचा आरोप करत आक्षेपार्ह टीका केली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही काँग्रेस व राष्ट्रवादी समर्थकांनी बाबासाहेब पवार यांना कार्यक्रमातच मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ तालुक्यात समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. पवार यांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पैठण पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पैठण विभागाचे डीवायएसपी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि लक्ष्मण केंद्रे अधिक तपास करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button