उद्योगाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार : मुरलीधर मोहोळ | पुढारी

उद्योगाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार : मुरलीधर मोहोळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग एमएसएमई आणि स्टार्टअप्सच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिले. मोहोळ यांच्या प्रचारासाठी मंडई, गाडीखाना, खडकमाळ आळी, कस्तुरे चौक, कृष्णाहट्टी चौक, लोहियानगर, मीठगंज पोलिस चौकी परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधुरी मिसाळ, हेमंत रासने, दीपक मिसाळ, स्वरदा बापट, अजय खेडेकर, विष्णू हरिहर, आरती कोंढरे, सम्राट थोरात, योगेश समेळ, राजेश येनपुरे, संजय देशमुख, राजेंद्र कोंढरे, राजेंद्र काकडे, अमित कंक, चंद्रकांत पोटे, गौरव साइनकर, प्रशांत सुर्वे, नीलेश कदम, गणेश भोकरे, अजय दराडे, कपिल जगताप, प्रमोद कोंढरे, प्रणव गंजीवाले, उमेश चव्हाण, अभिजित राजपूत, दिलीप काळोखे, उदय लेले, अश्विनी पवार, निर्मल हरिहर, संकेत थोपटे, वैशाली नाईक, निलेश जगताप, नामदेव माळवदे, ईश्ताइक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी मोहोळ म्हणाले, एमएसएमई आणि स्टार्टअप क्षेत्राची क्षमता वाढवून शहराला देशात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. स्वतंत्र विमानतळ, पायाभूत सुविधांची निर्मिती, किफायतशीर औद्योगिक वीजदर, मुबलक पाणी, कुशल मनुष्यबळ, मोक्याची जागा, सुरळीत वाहतूक आदी उद्योगांसाठी आवश्यक असणार्‍या बाबी मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करू. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी नियमित संवाद साधणार आहे. आयटी हबला बूस्टर मिळावा यासाठी धोरण आखणार आहे. आयटी हबमुळे बांधकाम क्षेत्रापासून लॉन्ड्री, मेसपर्यंत छोट्या-मोठ्या व्यवसायांतून रोजगारनिर्मिती होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. राज्याच्या दरडोई उत्पन्नात 18 टक्के वाटा पुणे शहराचा आहे. उद्योग, सेवा आणि व्यावसायिकांना उपयुक्त ठरेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच, निर्यातवाढीसाठी जिल्ह्याचा आराखडा तयार करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button