पदावरून हकालपट्टी, बसप ‘वारसदार’ आकाश म्‍हणाले, “मायावतींचा आदेश…” | पुढारी

पदावरून हकालपट्टी, बसप 'वारसदार' आकाश म्‍हणाले, "मायावतींचा आदेश..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लाेकसभा निवडणूक रणधुमाळीत बसपच्या राष्ट्रीय संयोजक पदावरून हटविल्यानंतर आकाश आनंद यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बसपा नेत्या आणि पक्षप्रमुख मायावती (Mayawati) यांच्या निर्णयानंतर आकाश आनंद ( Akash Anand) यांनी  सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) राष्ट्रीय संयोजकपदावरून बडतर्फ झाल्यानंतर मायावतींचे भाचे आकाश आनंद यांनी पक्षप्रमुख मायावतींना बहुजन समाजासाठी आदर्श म्हणून वर्णन केले आहे. तसेच अखेरच्‍या श्वासापर्यंत भीम मिशन आणि समाजासाठी लढत राहणार असल्याचेही त्यांनी स्‍पष्‍ट केले आहे. त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये लिहिले आहे की, “बसप प्रमुख मायावती, तुम्ही संपूर्ण बहुजन समाजासाठी आदर्श आहात, करोडो देशवासी तुमची पूजा करतात. तुमच्या धडपडीमुळेच आज आपल्या बहुजन समाजाला सन्मानाने जगायला शिकला आहे. तुम्ही आमचे सार्वत्रिक नेते आहात. तुमचा आदेश अंतिम आहे. भीम मिशन आणि माझ्या समाजासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन.”

आकाश आनंद यांना प्रक्षोभक भाषण भोवले

सीतापूरमधील जाहीर सभेत आकाश आनंदने भाजप नेत्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती. हे प्रक्षोभक भाषण आकाश आनंद यांना चांगलेच भोवले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बसपा सुप्रीमो मायावती यांनी ही बाब गांभीर्याने घेत आकाश आनंदच्या रॅलीच्या आयोजनावर बंदी घातली होती. असे असतानाही ते दिल्लीतील पक्ष समर्थक, विद्यार्थी, शिक्षक आदींशी संपर्क साधत राहिले आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत राहिले. अखेर मायावती यांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांना दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवरून हटवले.

राष्‍ट्रीय समन्‍वयक पदावरुन हकालपट्टी

बीएसपी सुप्रिमोने मंगळवारी एक निवेदन जारी करून त्यांची राष्ट्रीय समन्वयक पदावरून हकालपट्टी केली. आकाश आनंदचे वडील आणि आपले बंधू आनंद कुमार यांना मायावतींनी पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी पूर्वीप्रमाणेच जबाबदारी पार पाडण्यास सांगितले आहे.

बसपाचे उत्तराधिकारी पदावर केवळ पाच महिने राहिले

बहुजन समाज पक्षाची नवी पिढी म्हणून पक्षातील महत्त्वाच्या पदांवर नियुक्त झालेल्या आकाश आनंद यांची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या पाच महिन्यांत बसपच्या सर्वेसवार्व मायावती यांनी त्यांच्याकडून राष्ट्रीय समन्वयकपद आणि उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी हिसकावून घेतली. आपला निर्णय बलिदान म्हणून देत त्यांनी बसपा कोणत्याही परिस्थितीत आपल्या आंदोलनापासून डगमगणार नाही, असा संदेशही दिला.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लखनऊमध्ये झालेल्या पदाधिकारी परिषदेत मायावतींनी आकाश आनंद यांना त्यांचा उत्तराधिकारी घोषित केले होते. मात्र, आकाश यांना उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडपासून दूर ठेवण्याचा निर्णयही घेतला होता. असे असतानाही लोकसभा निवडणूक आली की, आकाश आनंद यांनी जाहीर सभा घेणे सुरु केले.

वारसदार आकाश आनंद यांच्‍यावरील कारवाईचे कारण काय ?

उत्तर प्रदेशमधील राजकीय विश्‍लेषकांच्‍या मते, आकाश आनंद यांनी आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष आणि नगीना उमेदवार चंद्रशेखर आझाद उर्फ ​​रावण यांच्यावर थेट हल्लाबोल केला. ही टीका मायावती यांना रुचली नाही. आकाश आनंद यांच्‍या या भूमिकेचा चंद्रशेखर यांना राजकीय फायदा मिळण्याची शक्यता असल्‍याने मायावती नाराज होत्‍या. यानंतर आकाश आनंद यांनी सीतापूरमध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषणाने मायावती कमालीच्‍या नाराज झाल्‍याचे मानले जात होते. या भाषणामुळे बसपचे जिल्हाध्यक्ष विकास राजवंशी, लखीमपूरचे उमेदवार अंशय कालरा, धौराहराचे उमेदवार श्याम किशोर अवस्थी, सीतापूरचे उमेदवार महेंद्र सिंह यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर मायावती यांनी आकाश आनंद यांना पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्‍त केले.

सीतापूरमधील प्रक्षोभक भाषण प्रकरणी आकाश आनंद यांच्‍यासह बसपाच्‍या पदाधिकार्‍यांवर गुन्‍हा दाखल झाला आहे. यानंतर मायावती यांनी आकाश आनंद यांना जाहीर प्रचारात सहभागी होवू नये, असा आदेश दिला होता. असे असतानाही ते सातत्याने दिल्लीत प्रचार करत होते. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थी, दिल्ली विद्यापीठातील शिक्षक आणि परदेशात स्थायिक झालेल्या बहुजन समाजातील लोकांशी संपर्क साधत त्यांनी बसपाचा प्रचार केला. बसपाचे नेतृत्व ज्या मुद्द्यांना टाळत आहे अशा मुद्द्यांवरही त्‍यांनी बोचरी टीका केली. बसपा प्रुखक निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल कठोर कारवाईची मागणी करत होते. अशा स्थितीत त्यांनी सर्वप्रथम आपल्या वारसदारावरच कारवाई करत लोकसभा निवडणुकीच्‍या रणधुमाळीत पक्षातील नेत्‍यांचा एक प्रकारचा संदेशच दिला असल्‍याची चर्चा उत्तर प्रदेशच्‍या राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा :

 

Back to top button