नाशिक : वनजमिनीवर सौर ऊर्जा कंपनीचे अतिक्रमण | पुढारी

नाशिक : वनजमिनीवर सौर ऊर्जा कंपनीचे अतिक्रमण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वनजमिनीच्या परस्पर खरेदी-विक्रीमुळे चर्चेत आलेल्या नांदगाव तालुक्यात वनजमिनीवर सौर ऊर्जा कंपनीने अतिक्रमण केल्याची धक्कादायक बाब वणी दक्षता पथकाने उजेडात आणली. तळवाडे नियतक्षेत्रात वनजमिनीवर अतिक्रमण करून अवैध उत्खनन करणारा जेसीबी व ट्रॅक्टर दक्षता पथकाने जप्त केला. या प्रकरणी संशयित प्रकाश बाबूराव भावसार याच्याविरोधात वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदगाव वनपरिक्षेत्रातील तळवाडे नियतक्षेत्रात सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या कंपनीने डॉक्टरवाडीनंतर पांझण या ठिकाणी वन संज्ञेतील जमिनीवर अवैध सौर ऊर्जा प्रकल्प उभारून पांझण ये‌थील वाटप वनक्षेत्रधारकांकडून क्षेत्र ताब्यात घेऊन त्यांना इतर वनक्षेत्रावर परस्पर वाटप करून देत असल्याची माहिती दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी यांना मिळाली होती. त्यांनी वणी दक्षता पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार यांना निर्देश देऊन त्यांच्यासह वनपाल वैभव गायकवाड व वाहनचालक हर्षल कोमटे यांनी तळवाडे नियतक्षेत्रातील राखीव वन कक्ष क्रमांक ४८९ मध्ये पाहणी केली. दक्षता पथकाच्या पाहणीत संशयित प्रकाश भावसार यांना अतिक्रमण व अवैध उत्खनन करताना जेसीबी व ट्रॅक्टरसह रंगेहाथ पकडले.

दरम्यान, पांझण येथील वन संज्ञेतील जमिनीवर वाणिज्यिक प्रकल्प उभारणीला वनसंवर्धन अधिनियम १९८० अन्वये बंदी असताना कंपनीने उभारलेला बेकायदेशीर प्रकल्प त्वरित ‌थांबविण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही कंपनीचे काम प्रगतिपथावर असल्याने लवकरच या प्रकल्पासह डॉक्टरवाडी येथील सौर ऊर्जा प्रकल्प सील करण्याचे नियोजन दक्षता कडून सुरू आहे. या प्रकरणी नांदगाव प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहेत्रे अधिक तपास करीत आहेत.

वनकर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न

अतिक्रमणासह अवैध उत्खनन प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या दक्षका पथकाला सौर ऊर्जा कंपनीच्या कामगारांकडून विरोध करण्यात आला. या कामगारांकडून बळाचा वापर करत वनकर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनकर्मचाऱ्यांनी विरोध झुगारून लावत धडक कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button