जालना : एक लाख महिलांचा अर्ध्या तिकीटात प्रवास; एसटीबसमध्ये महिलांची गर्दी वाढली | पुढारी

जालना : एक लाख महिलांचा अर्ध्या तिकीटात प्रवास; एसटीबसमध्ये महिलांची गर्दी वाढली

जालना; पुढारी वृत्तसेवा : एसटी बसमध्ये महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी १७ मार्चपासून सुरू झाली आहे. एसटीच्या जालना विभागातील चार आगारातुन २२ मार्च पर्यंत गेल्या 10 दिवसात एक लाख महिलांनी सवलतीत प्रवास केला. राज्य सरकारच्या निर्णयाने एसटी बसमधे पुर्वीच्या तुलनेत महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महीलांना प्रवास भाड्यात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. जालना विभागातील जालना, अंबड, परतुर व जाफराबाद या चार आगारांच्या बसमधून पहिल्या दहा दिवसांमध्ये सुमारे एक लाख महिलांनी सवलतीच्या दरात प्रवास केल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली. राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत घोषित केली. ‘महिला सन्मान योजना’ या नावाने ही योजना लागू करण्यात आली. या अंतर्गत सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसमध्ये महाराष्ट्र अंतर्गत सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.

१७ मार्चपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी केवळ साडेसातशे महीलांनीच या सवलतीचा लाभ घेतला होता. योजनेची माहिती प्रवास करणाऱ्या महीलांच्या माध्यमातुन सर्वत्र पोहचल्यानंतर दुसऱ्या दिवशी बसस्थानकावर महिलांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. जालना विभागातील चार आगारांतून एकूण एक लाख महिलांनी सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेतला आहे. सवलत मिळण्यापुर्वी एसटीतील महिला प्रवाशांची गर्दी कमी होती. १७ मार्च पासुन महीलांना सवलत सुरु झाली. तत्पुर्वीच्या दहा दिवसात जवळपास ५० हजार महीलांनी प्रवास केला होता. मात्र सवलत मिळाल्यानंतर त्यात तब्बल ५० हजार महीला प्रवाशांची वाढ झाली आहे.

शिवशाहीमध्ये वाढली गर्दी

महिलांना प्रवास भाड्यात सवलत देणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर शिवशाही बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र पहिल्या सहा दिवसांमध्ये दिसून आले. सवलत लागू झाल्यानंतर साध्या बसच्या पूर्ण भाड्यापेक्षा शिवशाही बसचे सवलतीचे भाडे कमी लागत असल्याने महिला शिवशाही बसमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button