मराठी भाषा गौरव दिन : नाशिकमध्ये ग्रंथदिंडीतून मराठीचा जागर | पुढारी

मराठी भाषा गौरव दिन : नाशिकमध्ये ग्रंथदिंडीतून मराठीचा जागर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज ग्रंथदिंडीतून माय मराठीचा जागर करण्यात आला.  विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ दिंडी काढण्यात आली. प्रथम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाधिकारी गंगाधरन डी., विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले.

 

त्यानंतर पुलकुंडवार आणि बी. जी. शेखर पाटील यांनी स्वतः दिंडी खांद्यावर घेतली. अग्रभागी मनपाचा चित्ररथ होता. सुमारे 600 विद्यार्थ्यांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग होता. विविध शाळांची कला पथक होते. लेझीम, ढोल वादनाने चैतन्य निर्माण झाले होते. झेंडा, झांज पथक, गंगापूर येथील वाघ गुरुजी बालविकास शाळेचे संबळ पथक आणि आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर करून लक्ष वेधले. वारकरी, किर्तनकार, विठ्ठल-रुक्मिणी, बहिणाबाई, मुक्ताबाई, शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, भगतसिंग यांच्या वेशभूषेत मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. मराठी भाषा, ग्रंथ यांची महती सांगणारे घोषवाक्याचे फलक हाती घेत तर काही विद्यार्थिनींनी ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथ आणि कळस, तुळशी वृंदावन डोक्यावर घेत मराठीचा जागर केला.

फुगड्या खेळत, भगव्या पताका उंचावत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सिव्हील हॉस्पिटल जिल्हाधिकारी कार्यालय, मेन रोड, शालिमार अशा मार्गाने ग्रंथ दिंडीचा प्रवास सुरू होता. शहरवासीयांनी या सुंदर सोहळ्याला दाद दिली. अनेक नागरिकांना दिंडीतील क्षणचित्रे मोबाईल मध्ये टिपण्याचा मोह झाला. प. सा. नाट्यगृहात मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडीचा समारोप झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी राजभाषेचा कौतुक करणारा हा भव्य सोहळा कायमच संस्मरणात राहणार आहे. या कार्यक्रमाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाहक मकरंद हिंगणे, कोषाध्यक्ष दत्तप्रसाद निकम, सहकार्यवाह अरविंद ओढेकर, विश्वस्त राजेंद्र ढोकळे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, ‘सावाना’चे सचिव सुरेश गायधनी, बालभवन प्रमुख सोमनाथ मुठाळ, महसूल उपायुक्त रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मनपा शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर, विभागीय माहिती कार्यालय उप संचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, भीमराज दराडे, गणेश मिसाळ, अरविंद नरसीकर, तहसीलदार राजश्री अहिरराव, अनिल दौंड, डॉ. विक्रांत जाधव, मनपा जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button