बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या जयघोषात सीमावासीय मुंबईकडे रवाना | पुढारी

बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या जयघोषात सीमावासीय मुंबईकडे रवाना

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हुतात्मे अमर रहे, रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे अशा गगनभेदी घोषणा देत हजारो सीमावासीयांनी मुंबईकडे कूच केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जाब विचारण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने मंगळवारी (दि. 28) पुकारलेल्या मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज (सोमवार) सीमावासीय मुंबईकडे निघाले. सकाळी साडेआठ वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाकडे विविध गावातील सीमावासीय एकत्र जमले.

समिती कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकात पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांचा गजर करण्यात आला. सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जाब विचारण्यासाठी सीमावासी पुन्हा एकवटले असून, मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात हजारो सीमावासी एकत्र येणार आहेत, अशी माहिती यावेळी किणेकर यांनी दिली.

यावेळी म. ए. समिती युवा नेते आर. एम. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, कृष्णा हुंदरे, राजू कुप्पेकर, पुंडलिक पावशे, डी. बी. पाटील, भागोजी पाटील, रामचंद्र कुद्रेमानीकर, अनिल हेगडे, जिल्हा पंचायत माजी सदस्या प्रेमा मोरे, नागेश किल्लेकर, विनायक पावशे यांच्यासह हिंडलगा, मण्णूर, आंबेवाडी, बाची, हंगरगे, सुळगा आदी गावातील लोक उपस्थित होते.

कंग्राळीत शिवस्मारकाचे पूजन

कंग्राळी खुर्द येथून सीमावासी मुंबईकडे रवाना झाले. यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा पंचायत माजी सदस्या सरस्वती पाटील यांनी, सीमाप्रश्नी महाराष्ट्राकडून वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगितले. यावेळी अ‍ॅड. एम. जी. पाटील, आर. आय. पाटील यांच्यासह गावातील अनेक जण उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button