जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय | पुढारी

जळगाव : रेल्वे प्रवासात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येतेय

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी प्रत्येक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतो. त्यामुळे रेल्वेत प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरी तसेच गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. गुन्हेगारीच्या घटनांमुळे प्रवाशांची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असून, याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

धावत्या रेल्वेत तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात पहिल्या घटनेत निजामुद्दीन हुबळी एक्स्प्रेससच्या बोगी क्रमांक ए -1 मधील 15 नंबरच्या सीटवर बसून महिला प्रवासी सुरभी आदित्य त्रिपाठी या ग्वालियर ते भुसावळ प्रवास करीत होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्रिपाठी यांचा झोपेचा फायदा घेऊन इटारसी ते खंडवा दरम्यान 30 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. हा गुन्हा खंडवा लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

सुरत पॅसेंजरमधून 37 हजारांचा ऐवज लांबवला…
भुसावळ-सुरत पॅसेंजरच्या कोच क्रमांक एस 5, बर्थ 71 वरून हाजी शेख जबीर शेख मुनाफ (चिनावल) हे प्रवास करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या डोक्याखाली ठेवलेली लेडीज पर्स लांबवली. पर्समध्ये 16 हजारांचा मोबाईल, 12 हजाराचा दुसरा मोबाईल, 10 हजार रुपये रोख असा एकूण 38 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी येथील लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो पुढील तपासासाठी नंदुरबार येथे वर्ग करण्यात आला आहे.

बरौनी एक्स्प्रेसमधून दिड लाखांचा ऐवज लंपास…
रोशन कुमार रमेशचंद्र मालू (वय – 52, रा. नेहरू रोड शिवानी, मध्य प्रदेश) हे बरौनी एक्सप्रेसच्या ए-2 डब्यातील सीट 1 वर बसून अहमदाबाद ते भुसावळ असा प्रवास करीत असताना रोशनकुमार मालू यांच्या पत्नी डोक्याखाली लेडीज पर्स घेऊन झोपल्या. सुरत स्थानक येण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने ती पर्स लांबवली. त्यात 35 हजारांचे सोन्याचे पेंडल, 75 हजार रुपये रोख, 42 हजार रूपयांचा वन प्लस मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड असा एकूण एक लाख 52 हजार रुपयाचा मुद्देमाल होता. लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो सुरत लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button