कराड : पुढारी वृत्तसेवा : कराड येथील मारुतीबुवा कराडकर मठाचे विश्वस्त व अध्यक्षांच्या डोक्यात वीणा घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाच्या तत्कालिन मठाधिपतीला न्यायालयाने दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रविकांत तु. साखरे यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावल्याची माहिती सहायक जिल्हा सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिली.
बाजीराव भागवत जगताप (वय 37, मूळ रा. कोडोली, ता. कराड) असे शिक्षा झालेल्या तत्कालीन मठाधिपती बाजीराव मामाचे मूळ नाव आहे. याबाबत अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील मारुतीबुवा कराडकर मठाचे विश्वस्त व अध्यक्ष यशवंत दाजी माने हे 23 एप्रिल 2019 रोजी मठामध्ये असताना बाजीरावमामा कराडकर हा आरडाओरडा करीत त्याठिकाणी आला. त्याने तेथील लाकडी वीणा उचलून घेतली. तसेच दिंडी कशी काढता ते बघतो, असे म्हणत लोकांशी वाद घातला. त्यावेळी मठाचे अध्यक्ष यशवंत माने यांच्याकडे पाहून तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत त्याने वीणा त्यांच्या डोक्यात घातली. त्यामध्ये यशवंत माने हे गंभीर जखमी झाले. मठात असलेल्या मोहन चव्हाण व अशोक शिंगण यांनी त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात बाजीरावमामा कराडकर याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. किर्दत व उपनिरीक्षक भरत चंदनशिवे यांनी तपास करुन न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांनी अकरा साक्षीदार तपासले. त्यापैकी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. तसेच डॉक्टरांची साक्षही महत्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने बाजीरावमामा कराडकर याला या गुन्ह्यात दोषी धरत सात वर्ष सक्तमजुरी व सात हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला अॅड. ऐश्वर्या यादव, अॅड. संध्या चव्हाण व अॅड. कोमल लाड यांनी सहकार्य केले.