Nashik : पहाटे कार धडकली, रात्री वाडाच कोसळला | पुढारी

Nashik : पहाटे कार धडकली, रात्री वाडाच कोसळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अशोकस्तंभ येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका मिठाई दुकानात कार धडकली होती. यात दुकानाचे नुकसान झाले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास हे दुकान असलेला वाडाच कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ग्रामीण पोलिस दलातील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या महेश विश्वनाथ पवार (४२, रा. नाशिक) यांचे एमएच १९, सीयू ०८४९ क्रमांकाच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार अशोकस्तंभ परिसरातील एका मिठाईच्या दुकानास धडकली. या अपघातात दुकानासह कारचे नुकसान झाले असून, कारचालकास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मिठाई दुकानाच्या काउंटरसह फ्रीज व इतर साहित्याचे नुकसान झाले. दरम्यान, मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास दुकान असलेला वाडा कोसळला. त्यावेळी तेथे दोन कामगार काम करत होते. सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी बचाव कार्यास सुरुवात केली.

दरम्यान, कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. संशयित कारचालक पवार यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, तपास सरकारवाडा पोलिस करीत आहेत.

Back to top button