पुणे : मार्केट यार्डात गाळ्यांचे बांधकाम? कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार | पुढारी

पुणे : मार्केट यार्डात गाळ्यांचे बांधकाम? कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मार्केट यार्डातील सुमारे 100 कोटींच्या भूखंडांवर विशिष्ट अडत्यांच्या गटासाठी रातोरात फाउंडेशनचे सुमारे 9 कॉलम उभारण्यात आले आहेत. डाळिंब यार्डबाबत पणन संचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तरीही आवारात पणन संचालक व महापालिकेच्या परवानगीविना बांधकामास सुरुवात झाली आहे. याबाबत, प्रशासनाशी विचारणा केली असता, संबंधित काम प्रकाश व्यवस्थेचे असून, ठेकेदारामार्फत हे काम केले जात असल्याचे सांगितले. मात्र, 9 कॉलम काढल्याने ट्रक पार्किंगमध्ये एवढी प्रकाश व्यवस्था कशासाठी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड फळबाजारात गेल्या अनेक वर्षांपासून ठराविक अडत्यांना डाळिंब विक्रीसाठी शेड दिले आहे. त्यानंतर इतर अडत्यांनीही अतिरिक्त आवकच्या नावाखाली नवीन शेडची मागणी प्रशासनाकडे केली. साधारण महिनाभरापूर्वी अडत्यांनी डाळिंब विक्रीला अतिरिक्त जागेची मागणी केल्यानंतर बाजार समितीने चार नंबर गेटलगत न्यायप्रविष्ट जागेत डाळिंब यार्ड बांधण्यासाठी जागा वाटप आणि भाडेकरार केले. मात्र, प्रसारमाध्यमांनी हा बेकायदा डाळिंब यार्डचा प्रकार उघडकीस आणला.

त्यानंतरच समितीने गुलटेकडी मार्केट यार्ड मुख्य प्रवेशद्वार समोरील स. नं 559 अ/2 ब/2 1 हेक्टर 34 आर म्हणजे सुमारे तीन ते सव्वातीन एकर सुमारे शंभर कोटी रुपये किमतीची मोक्याची जागा अडत्यांना दिली. यावर पणन संचालकांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर पुढील प्रक्रिया थांबविणे आवश्यक असताना या भूखंडावर बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे पणन संचालक यावर काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button