पुणे : 44 जोडप्यांनी साधला ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त; नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध | पुढारी

पुणे : 44 जोडप्यांनी साधला ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त; नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अथर्व अन् अमृताने (नाव बदलले आहे) व्हॅलेंटाईन डे दुपारी विवाह नोंदणी कार्यालय गाठले आणि साधेपणाने पण मोठ्या आनंदाने त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. या दोघांप्रमाणे मंगळवारी (दि.14) जागतिक प्रेमदिनी सुमारे 44 जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने लग्नाची रेशीमगाठ बांधली. मंगळवारी सकाळपासून विवाह नोंदणी कार्यालयात तरुण जोडपी आणि त्यांचे कुटुंबिय, नातेवाईकांची लगबग सुरु होती.

पारंपारिक वेशभूषेत आलेल्या जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने लग्न करून बाहेर पडल्यावर आनंद व्यक्त केला. फोटोसेशन केले. सेल्फी काढले. प्रत्येक सुवर्णक्षण छायाचित्रात कैद करणारे मित्र मंडळी अन् एकमेकांना पेढा भरविताना आनंद साजरा करणारे कुटुंबिय…असे काहीसे वातावरण कार्यालयात होते…आयुष्यभराचा सहवास, प्रेम जोडताना काही जोडपी भावूकही झाली.

एक-एक करुन दिवसभरात जोडपी कार्यालयात येत होती अन् सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव झाल्यानंतर अधिकार्‍यांच्या आणि साक्षीदारांच्या साक्षीने अनेकांचे लग्न होत होते. लग्न झाल्यानंतर कार्यालयाबाहेर आल्यानंतर जोडप्यांचा आनंद पाहण्यासारखा होता. विवाह नोंदणी अधिकारी लीना संगवार म्हणाल्या, नोंदणी पद्धतीने सुमारे 44 लग्न झाले. यासाठी त्यांनी पूर्वनोंदणी केली होती.

Back to top button