नंदुरबारमध्ये पिस्टल, जिवंत काडतूस जप्त; एकास अटक | पुढारी

नंदुरबारमध्ये पिस्टल, जिवंत काडतूस जप्त; एकास अटक

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार शहरात बेकायदेशीर लोखंडी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगताना आढळल्याने शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. शहादा तळोदा पाठोपाठ नंदुरबार शहरातसुद्धा अवैध शस्त्र बाळगणारे आढळत असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण / उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी अवैध अग्निशस्त्र व शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती हस्तगत केली. त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणेबाबत सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या. त्यानंतर काही अंतराने पी. आर. पाटील यांना शहरातील बसस्थानकाजवळील एका इसमाजवळ बंदूक दिसून आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पाटील यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कळवून माहितीची खात्री करण्याबाबत आदेश दिले. कळमकर यांनी संशयित इसमाचा शोध घेऊन ताब्यात घेणेबाबत अंमलदारांना सांगितले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने शोध घेत एका संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताची झडती घेतली असता त्याच्या कब्जात 15 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल वं व 600 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याची चौकशी केली तो, प्लॉट क्रमांक 111, राणी लक्ष्मीबाई चाळ कांदीवली इस्ट, मुंबई येथील रहिवासी असून, गेल्या 4 महिन्यांपासून उत्तर प्रदेश राज्यातील जोनपूर जिल्ह्याच्या रामपूर गावात वास्त्व्यास होता. ताब्यातील इसमाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button