नाशिक : ‘रविवार कारंजा’वर बहुमजली पार्किंगसाठी ना. भुसे यांना साकडे | पुढारी

नाशिक : ‘रविवार कारंजा’वर बहुमजली पार्किंगसाठी ना. भुसे यांना साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रविवार कारंजावरील यशवंत मंडई या जुन्या इमारतीच्या जागी बहुमजली पार्किंग उभारण्यात यावी, अशा स्वरूपाचे साकडे घालत महापालिकेने नव्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सचिन भोसले यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीतर्फे अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका स्मार्ट रोडचे काम तब्बल दोन वर्षे रखडले. यामुळे या भागातील व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीसह मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्याचप्रमाणे यशवंत मंडई पार्किंग कॉम्प्लेक्स करण्यासाठी मागील सहा वर्षांपासून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बीओटी तत्त्वावर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच बहुमजली पार्किंगचा प्रस्तावही प्रलंबित आहे. यशवंत मंडई परिसरातील असंख्य व्यापारी व रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, शहराचा वाढता विकास लक्षात घेता रविवार कारंजा, मेनरोड, सराफबाजार या शहराच्या मध्यवर्ती भागात पार्किंगची समस्या सुटावी याकरिता दिवंगत नगरसेविका सुरेखा भोसले यांनी यशवंत मंडईच्या जागी बहुमजली पार्किंग साकारण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु, आजही याबाबत प्रशासनाने लक्ष घातले नाही. रविवार कारंजा, मेनरोड व सराफबाजार येथील व्यापारी व नागरिकांनीदेखील याबाबतची मागणी केली होती. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने आता शिंदे सरकारच्या काळात तरी या प्रश्नाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासंदर्भात सचिन भोसले यांनी यशवंत मंडईची इमारत पाडून येथे बहुमजली पार्किंग स्थळ महापालिकेने स्वखर्चातून विकसित करावे, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रविवार कारंजा शहराची मुख्य बाजारपेठ आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत असते. त्यामुळे पार्किंग होणे गरजेचे असून, यशवंत मंडई या इमारतीची जागा त्यासाठी योग्य आहे. त्याकरिता मनपाने आर्थिक तरतूद करावी. – सचिन भोसले, शिंदे गट.

हेही वाचा:

Back to top button