पंढरपुरात माघी यात्रेस आलेल्या १३७ भाविकांना भगरमधून विषबाधा | पुढारी

पंढरपुरात माघी यात्रेस आलेल्या १३७ भाविकांना भगरमधून विषबाधा

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : बुधवारी माघी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. या सोहळ्यासाठी संत निळोबा सेवा मंडळ मठामध्ये आलेल्या भाविकांनी एकादशी दिवशी भगर व आमटी खाल्ल्यामुळे मठातील 137 भाविकांना विषबाधा झाली आहे. भाविकांना विषबाधा झाल्याचे लक्षात येताच या विषबाधीत झालेल्या भाविकांना गुरुवारी मध्यरात्री 2.30 वाजता येथील पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधीक्षक मनोजकुमार माने व टिमने वेळीच उपचार केल्याने बाधित सर्व भाविकांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने विषबाधा झालेल्या भाविकांची भेट घेतली. तसेच मठामध्ये तयार करण्यात आलेल्या भगर व आमटी या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. ज्या ठिकाणाहून भगर आणण्यात आली आहे. त्या दुकानदाराकडे चौकशी करण्यात येत आहे.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर माघी यात्रा भरली आहे. त्यामुळे राज्यभरातून व परराज्यातूनही लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत आले आहेत. याच यात्रेकरीता नादेंड व हिंगोली जिल्ह्यातील सुमारे 185 भाविक असलेली दिंडी पायी चालत पंढरपूर येथे 31 जानेवारी रोजी आले होते. ही दिंडी मागील 25 वर्षापासून येते. या दिंडीचा पंढरपूर येथील संत निळोबा सेवा मंडळ मठामध्ये मुक्काम होता. या भाविकांनी एकादशीच्या उपवासामुळे बुधवारी भगर व आमटी खाल्ली. फराळ केल्यानंतर हे भाविक मठात झोपी गेली. मात्र, गुरुवारी रात्री 2.30 वा यातील 137 भाविकांना मळमळ, उलट्या व चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. हे अचानक घडल्याने मठातून ही माहिती 108 रुग्णवाहिकेला देण्यात आली. तातडीने रुग्णवाहिकेव्दारे या बाधित भाविकांना उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले.

8 भाविकांना अतिदक्षात विभागात ठेवण्यात आले. यामध्ये वनिता यनगणवाड (वय 42), प्रदिप मुरमुरे (वय 14), जीवन काळे (वय 62), पंडीत वानखोडे (वय 55), दिगंबर तुतनर (वय 45), शोभाबाई देशमुख (वय 50), भगवान वानखोडे (वय 65), जनाबाई ढाकरे (वय 58) हे अतिदक्षात कक्षात उपचार घेत आहेत. तर जनरल वार्डात सारीका गंगाधर बल्लाळ (वय 35), राजु संभाजी मुरमुरे (वय 35), शिवाजी सटवाजी भिसे (वय 50), मुरलीधर रावजी अदमाने (वय 70), शंकर खंडू शेळके(वय 40), विश्वंभर सखाहरी धातरट (वय 60), गंगाबाई तुकाराम वानोळे (वय 60), भिमराव रामचंद्र सुर्यवंशी (वय 40), विठ्ठलसिंग संतरामसिंग ठाकूर (वय 39), विश्वनाथ रामचंद्र भिसे (वय 60), गंगाधर खंडूजी बल्लाळ (वय 43), पंढरीनाथ कोंडीबा दुधकावडे (वय 64), सुभाष विठ्ठल भुतनाळ(वय 30), सतीश दादाराव वानखेडे(वय 45), भरत पिराजी वानखेडे (वय 60), सटवा पिराजी मुळेकर (वय 70), विश्वंभर सखाहरी धात्रक(वय 60) आदी भाविकांना समावेश आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या या सर्व भाविकांवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आहे.

उपजिल्हा रुग्णालय दाखल झालेले 137 भाविकांपैकी काही भाविक अतिदक्षता विभागात तर काही भाविक जनरल वार्डात उपचार घेत आहेत. या भाविकांची प्रकृती स्थिर आहे. या भाविकांवर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

-महेशकुमार माने, वैद्यकीय अधीक्षक, उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर

 पंढरपूर शहरातील ज्या दुकानातून जेवण बनविण्याचे साहित्य आणले आहे. या त्या दुकानातील साहित्य व मठामध्ये तयार केलेले भगर व आमटीचे नमुने पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहेत. तपासणीनंतर योग्य ती कारवाई करु.

 -प्रशांत कूचेकर, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न औषध प्रशासन विभाग

 

       हेही वाचलंत का 

 

 

Back to top button