मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे आघाडीवर; संशयास्पद मतपत्रिकेवरून वाद | पुढारी

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे आघाडीवर; संशयास्पद मतपत्रिकेवरून वाद

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीत विक्रम काळे सहा हजार मतांची आघाडीवर आहेत. विक्रम काळे यांना पहिल्या पसंतीची १८ हजार मते मिळाली आहेत. तर किरण पाटील यांना १२ हजार, सूर्यकांत विश्वासराव यांना ११ हजार मते मिळाली आहेत.

मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. प्रारंभी मतपेट्या उघडून मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर मतांचे २५-२५ चे गठ्ठे करुन मोजणीसाठी ५६ टेबलवर प्रत्येकी ४० गठ्ठे देण्यात आले. दुपारी १२ वाजेपर्यंत वैध-अवैध मतांचे वर्गीकरण करण्यात आले.

संशयास्पद मतपत्रिकेवरून वाद

मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सकाळी ११.३० वाजता एका मतपत्रिकेवर संशयास्पद खुण मिळाली. यावरून भाजप उमेदवार किरण पाटील यांचे प्रतिनिधी शिवाजी दांडगे आणि मतमोजणी अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे मतमोजणी स्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. या मतपत्रिकेवर पहिल्या पसंतीचे मत विक्रम काळेंना तर दुसर्‍या पसंतीचे मत किरण पाटील यांना नोंदवलेले होते. शिवाय संशयास्पद खूण आढळली होती. अखेर निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या मध्यस्थीने वाद मिटला. दरम्यान ५३ हजार २५७ एवढे मतदान असल्याने व एका टेबलवर एक हजार मतांची मोजणी होणार असल्याने ५६ पैकी ३ टेबलांवरील काम बंद करण्यात आले.

Back to top button