नाशिक : रात्रीची घंटागाडी नियमित सुरू; रहिवाशांकडून स्वागत | पुढारी

नाशिक : रात्रीची घंटागाडी नियमित सुरू; रहिवाशांकडून स्वागत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून अनियमित झालेल्या रात्रीच्या घंटागाडीची सेवा आता प्रभाग क्रमांक २४ मध्ये पुन्हा नियमित सुरू राहणार आहे. सकाळी लवकर घराबाहेर पडणार्‍या व संध्याकाळी परतणार्‍या नोकरदार रहिवाशांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत आहे. याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनसह रहिवाशांनी महापालिकेचे आभार मानले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक २४ मध्ये दि. २१ एप्रिल २०२२ पासून रात्रीची घंटागाडी सुरू करण्यात आली होती. गोविंदनगर, कर्मयोगीनगर, सद्गुरूनगर भागात दोन घंटागाड्या घरोघरी रात्री कचरा संकलित करीत होत्या. शहरातील या पहिल्याच प्रयोगाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, अनियमित घंटागाड्या येत नसल्याने ही सेवा विखंडित स्थितीत सुरू होती. महापालिकेने नवीन ठेकेदारामार्फत १ डिसेंबरपासून पुन्हा घंटागाडी सुरू करण्यास प्रारंभ झाला आहे.  तसेच आता तरी अखंडपणे या प्रभागात ही सेवा नियमित सुरू करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांनी नागरिकांच्या वतीने महापालिकेला दिला होता. याबाबत १ डिसेंबर २०२२ रोजी देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी घेतली. त्यानुसार सोमवार, दि. ५ डिसेंबरपासून रात्रीची नियमित घंटागाडी सुरू केली. या नव्या घंटागाडीचे पूजन करून रहिवाशांनी नियमित सेवेचे स्वागत केले. यावेळी चारुशीला गायकवाड (देशमुख), बाबासाहेब गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे यांच्यासह नागरिकांनी महापालिकेचे आभार मानले.

येथे दिली जाणार सेवा….

गोविंदनगर, जुने सिडको, कालिका पार्क, उंटवाडी, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर या भागात रात्रीच्या नियमित घंटागाडीमुळे रहिवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button