नगर: कोटमारा धरणाचे परस्पर ‘बोटमारा’ नामकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर | पुढारी

नगर: कोटमारा धरणाचे परस्पर ‘बोटमारा’ नामकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर

बोटा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्याचे पठार भागात आंबी दुमाला व कुरकुटवाडी गावाच्या मध्यवर्ती महत्त्वपूर्ण असलेले कोटमारा धरण या भागासाठी जीवनदान देणारे धरण मानले जाते. परंतु अकोले सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांनी परस्पर नामकरण करत या धरणाचे बोटमारा धरण नामनिर्देशन केले आहे. त्या पद्धतीची नामनिर्देशन पाटी देखील धरणाच्या कडेला रस्त्यावर लावण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.

हे धरण पाहण्यासाठी विविध भागातून पर्यटक येथे येतात. त्यांनी या ठिकाणी काढलेले फोटो, सेल्फी सोशल मीडियावर टाकले जातात. त्या पोस्ट मध्ये बोटमारा धरण म्हणून उल्लेख केला जात आहे. यामुळे हे धरण बोटमारा धरण नसून कोटमारा धरण आहे, असे सांगताना सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांचे दुर्लक्षित कारभारावर नागरिक संताप व्यक्त करत आहे.

अकोले तालुक्यातील पठार भागात सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांचे मार्फत बेलापूर ते बोटा रस्त्याचे रस्त्याचे खड्डे तात्पुरते बुजविण्यात आले आहे. या रस्त्याचे दुरुस्तीचे काम करताना साईट पट्टीच भरली गेली नाही. रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे झुडपे ‘जैसे थे’ असून आंबी दुमाला व कुरकुटवाडी गावच्या मधी असलेलं ‘कोटमारा’ धरणाच्या फलकाचे नामकरण करून ‘बोटमारा’ करण्यात आल्याने नागरिकांत संतापाची लाट पसरली असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्षित कारभार चव्हाट्यावर येत आहे.

तालुक्यातील पठार भागात सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांचे मार्फत गेल्या महिन्यात बेलापूर ते बोटा रस्त्याचे खड्डे तात्पुरते भरले असल्याचे निदर्शनास आले आहे.यात मोठमोठे खड्डे बुजविले आहे. परंतु छोटे खड्डे तसेच सोडून दिले आहे.या रस्त्याच्या कडेच्या साईट पट्ट्या गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्या आहेत. परंतु या रस्त्याची दुरुती करताना साईट पट्टी भरणे गरजेचे होत्या. परंतु साईट पट्ट्याच भरल्या नसल्याने या रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली गेली असल्याचे नागरिक व्यक्त होत आहे. रस्त्याच्या कडेच्या झाडा झुडपांची परीस्थिती ‘जैसे थे’ असल्याने वाहन धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पठार भागातील नागरिकांची बोटा ते राजूर या राज्यमार्गाचे दुपदरीकरण करण्याची मागणी प्रलंबित आहे. या मागणीची लवकरात लवकर दखल घ्यावी. तसेच बेलापूर ते बोटा या रस्त्याचे डांबरीकरण काम नव्याने करावे. रस्त्याची साईट पट्टी भरण्यात यावी.झाडे झुडपे काढण्यात यावी. कोटमारा धरणावरील चुकीच्या नावाची पाटी काढावी. कोटमारा धरण नावाची नामनिर्देशक पाटी लावण्यात यावी, अशी मागणी या विभागातील नागरिक करत आहे.

Back to top button