वडगाव मावळ : महिला मंडल अधिकारीसह एकजण जेरबंद | पुढारी

वडगाव मावळ : महिला मंडल अधिकारीसह एकजण जेरबंद

वडगाव मावळ : पवन मावळ भागातील शिवणे येथील महिला मंडल अधिकार्‍यासह एका सहकार्‍यास 20 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी अटक केली.

मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर व खासगी व्यक्ती संभाजी लोहोर असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या भडवली येथील जमिनीच्या 7 /12 उतार्‍यावर त्यांचे नाव लावण्याकरिता मंडल अधिकारी संगीता शेरकर व संभाजी लोहोर यांनी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

या संदर्भात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर त्यांनी शुक्रवारी (दि.2) पडताळणी करून मंगळवारी (दि.6) 20 हजार रुपयांची लाच मंडल अधिकारी संगीता शेरकर यांनी आढले बुद्रुक तलाठी कार्यालय तालुका मावळ येथे स्वीकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Back to top button