नाशिक : चंद्राची मेटमध्ये ग्रामफेरीद्वारे स्वच्छतेचा जागर | पुढारी

नाशिक : चंद्राची मेटमध्ये ग्रामफेरीद्वारे स्वच्छतेचा जागर

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चंद्राची मेट येथे जागतिक शौचालय दिनानिमित्त ग्रामफेरी काढून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.

शौचालयाचा वापर करून परिसरात स्वच्छता पाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामफेरीच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच वैयक्तिक शौचालय व कुटुंबांना भेट देऊन शौचालय वापराचे महत्त्व समजाविले. बचतगटाच्या महिलांना मार्गदर्शन करून मान्यवरांनी ग्रामफेरीद्वारे गावाची स्वच्छता पाहणी केली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात येतो. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण स्वच्छता शाश्वत स्वरूपात टिकविण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत ग्रामीण भागात सार्वजनिक शौचालय संकुलांचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय बांधकाम आदी स्वरूपांची कामे करण्यात येत आहेत. संत गाडगेबाबा अभियान व स्वच्छ भारत अभियानाच्या कामांची सांगड घालून ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा शौचालय व ट्रायसायकल, कचरा संकलन केंद्र, नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन झाले. गटविकास अधिकारी किसन खताळे, सरपंच सरिता चंद्रे, राजेंद्र चंद्रे, भगवान देहाडे, ग्रामसेवक गणेश मोढे, विस्तार अधिकारी सपकाळे, पवार, जिल्हा परिषदेच्या माधवी गांगुर्डे, राहुल मराठे, गट समन्वयक दीपक भोये, आनंदा पवार, कनिष्ठ अभियंता शिनकर तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button