विधानसभा निवडणूक : गुजरातमध्ये प्रचार टिपेला | पुढारी

विधानसभा निवडणूक : गुजरातमध्ये प्रचार टिपेला

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता केवळ दहा दिवसांचा कालावधी उरला आहे. ज्या 89 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे, तेथे प्रचाराचा धुरळा उडाला आहे.

भाजपच्या प्रचारकांची फौज ठाण मांडून

भाजपच्या असंख्य प्रचारकांची फौज गुजरातमध्ये ठाण मांडून आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापर्यंतच्या नेत्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री जाहीर सभा घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचारावर तीक्ष्ण नजर आहे. राज्यातील गांधीनगर दक्षिण मतदारसंघाकडे यावेळी सर्वांचे लक्ष आहे. कारण, तेथे ओबीसी नेते अल्पेश ठाकूर भाजपकडून मैदानात उतरले आहेत.

पेटलाडमध्ये बसणार काँग्रेसला दणका?

काँग्रेसच्या तिकिटावर सहावेळा निवडून आलेल्या निरंजन पटेल यांचे तिकीट यावेळी कापले आहे. आनंद जिल्ह्यातील पेटलाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या पटेल यांनी त्यामुळे बंडाची भूमिका घेतली असून त्याचा फटका काँग्रेसला या मतदारसंघात बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जातीय राजकारणामुळे संधी देण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप पटेल यांनी केला आहे. काँग्रेसने पेटलाडमध्ये डॉ. प्रल्हाद परमार यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट कापल्यानंतर पाटीदार आंदोलनाच्या नेत्या रेश्मा पटेल यांनी राष्ट्रवादीला रामराम करीत आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांचे पुत्र महेंद्रसिंग यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बायड मतदारसंघातून ते यावेळी नशीब आजमावत आहेत.

पहिल्या टप्प्यासाठी 788 उमेदवार रिंगणात…

पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत. यात 70 महिलांचा समावेश आहे. एकूण उमेदवारांपैकी जवळपास निम्म्या म्हणजे 339 जणांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. भाजप आणि काँग्रेसने सर्वच्या सर्व 89 मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. आपने 88 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. बसपाने 57, तर एमआयएमने 6 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

आपच्या कामगिरीकडे लक्ष…

गुजरात निवडणुकीत पहिल्यांदाच पूर्ण ताकतीने उतरलेल्या आपकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाला किती टक्के मते मिळणार, यावर विशेष करून राजकीय जाणकारांची नजर आहे. पक्षाला पाच ते सहा टक्के मते मिळतील व एखाद्या मतदारसंघात विजय मिळेल, असे निवडणूकपूर्व अंदाजात सांगितले जात आहे. प्रत्यक्षात काय होणार, हे मतदारराजाच्या हातातच आहे. मतांची टक्केवारी आणि विजयी उमेदवारांची संख्या याचा अर्थाअर्थी फारसा संबंध येत नाही. याचे उदाहरण म्हणून उत्तर प्रदेशच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीकडे पाहता येईल. त्यावेळी मायावतींच्या बसपाला 20 टक्के मते मिळाली होती; पण एकही उमेदवार जिंकू शकला नव्हता.

प्रचारात काँग्रेसचीही आघाडी…..

पहिल्या टप्प्यातील प्रचारात काँग्रेसदेखील कमी पडलेली नाही. पक्षाने जी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे, त्यात राहुल गांधी, प्रियांका गांधी-वधेरा, सोनिया गांधी, केरळचे रमेश चेन्नीथला, मध्य प्रदेशचे दिग्विजय सिंग, कमलनाथ, हरियाणाचे भूपिंदर हुडा, महाराष्ट्राचे अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची रणनीती आखली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही सध्या गुजरातमध्ये ठाण मांडून आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुुरू असतानाच गुजरातमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पक्षाला मोठे बळ मिळाले आहे.

Back to top button