नाशिक : एसटी बसमध्येच झाला गोंडस बाळाचा जन्म | पुढारी

नाशिक : एसटी बसमध्येच झाला गोंडस बाळाचा जन्म

नाशिक (नांदूरशिंगोटे) : प्रकाश शेळके
सिनेमाच्या रूपाने अथवा अतिदुर्गम भागांत काही दुर्मीळ किस्से अथवा घटना घडत असतात. ज्याने आपल्या भुवया उंचावतात किंवा बोट तोंडात जाते. इकडे नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे येथे गुरुवारी (दि.17) दुपारी दीड वाजता चक्क एसटी बसमध्ये एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला.

सटाणा येथील गवळीबाई तुकाराम सोनवणे (23, रा. नरकुल, ता. सटाणा) ही महिला व तिचे पती असे दोघे ऊसतोड कामगार आहे. ते बेला येथून सटाणा येथे आपल्या गावी जात होते. गवळीबाईला सकाळपासूनच प्रसूती कळा येत होत्या. मात्र, तिने पतीलाही हा प्रकार सांगितला नाही. बस पुणे-सटाणा ही नांदूरशिंगोटे गावात पोलिस दूरक्षेत्राजवळ पोहोचताच या महिलेने बसमध्ये बाळाला जन्म दिला. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून चालकाने त्वरित बस पोलिस दूरक्षेत्रासमोर रस्त्याच्या कडेला उभी केली. माहिती मिळताच येथील डॉ. राधाकृष्ण सांगळे, डॉ. शांताराम घुगे, डॉ. संतोष सानप यांनी त्वरित दाखल होऊन विना मोबदला बाळंतपण केले. बाळ आणि बाळंतिणीला पुढील उपचारांसाठी जवळच असलेल्या दोडी बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मावळते सरपंच गोपाळ शेळके व ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात येताच मदतीला धावले. तातडीने अ‍ॅम्बुलन्सला पाचारण करून दोडी बुद्रुक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. डॉ. कामिनी शिंदे यांच्यासह कर्मचार्‍यांनी यशस्वी उपचार सुरू केले. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

खासगी डॉक्टरांनी दिली विनामूल्य सेवा…
अलीकडच्या काळात माणुसकी हरवत असल्याचे पदोपदी जाणवते. येथे मात्र चालकाने आहे त्या स्थितीत बस थांबविली. खासगी डॉक्टरांनी धाव घेऊन विनामूल्य सेवा दिली. तसेच मावळते सरपंच शेळके यांच्यासह ग्रामस्थही मदतीला धावले.

हेही वाचा:

Back to top button