नाशिकच्या तिघांची आजपासून सप्तमोक्षपुरी सायकल वारी | पुढारी

नाशिकच्या तिघांची आजपासून सप्तमोक्षपुरी सायकल वारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सायकलिंग क्षेत्रात सुपरिचित असलेले गणेश लोहार व त्यांचे दोन सुपुत्र वेदांत व अथर्व हे भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी सप्त मोक्षपुरी यात्रा ते सायकलिंगद्वारे करत आहे. आज शुक्रवारी (दि. ४) सकाळी ६ वाजता काळाराम मंदिर येथून यात्रेला प्रारंभ झाला. केंद्र शासनाच्या ‘लाइफ मिशन फॉर एन्व्हाॅयर्न्मेंट’ याविषयी जनजागृती आणि भारतीय संस्कृती व योग यांच्या प्रचार व प्रसार या मोहिमेत केला जाणार आहे.

सप्तमोक्षपुरीमध्ये अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांचीपुरम, उज्जैन व द्वारका ही नगरे येतात. मोहीम ७ हजार किलोमीटरची असून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा नऊ राज्यांमधून लोहार पितापुत्र प्रवास करणार आहेत. तिघेही रस्त्याने येणाऱ्या गावांमध्ये मुक्कामी असताना लोकांना भेटून जनजागृतीसह सविस्तर माहिती देणार आहे.

लोहार पितापुत्रांच्या सप्तमोक्षपुरी सायकल मोहिमेस नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष किशोर माने, माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, प्रवीण खाबीया, राजेंद्र फड यांच्यासह नाशिककरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, भारतीय संस्कृतीतील सप्तमोक्षपुरी ही यात्रा लोकसहभागातून करण्याचा दंडक आहे. त्यामुळे मोहिमेसाठी यथाशक्ती मदत करावी. आर्थिक मदत ही संपूर्णपणे ऐच्छिक आहे. जास्तीत जास्त लोकसहभागातून ही मोहीम पूर्ण करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button