लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी BYJU's चा ब्रँड अ‍ॅम्‍बेसीडर, कंपनीकडून घोषणा | पुढारी

लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी BYJU's चा ब्रँड अ‍ॅम्‍बेसीडर, कंपनीकडून घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा सपाटा लावलेल्या BYJU’s ने लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची ब्रँड अ‍ॅम्‍बेसीडर म्हणून नियुक्ती केली आहे. एडटेक डेकाकॉर्न ‘बायजू’ने शुक्रवारी जाहीर केले की ते फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला त्यांच्या सर्वांसाठी शिक्षणाचा अ‍ॅम्‍बेसीडर म्हणून नियुक्त करणार आहेत. नवीन ब्रँड अॅम्बेसीडर म्हणून मेस्सीच्या नियुक्तीबद्दल बोलताना एडटेक जायंटच्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांनी म्हटले आहे, “आम्ही लिओनेल मेस्सीला आमचा ग्लोबल अ‍ॅम्‍बेसीडर म्हणून नियुक्त करताना उत्साहित आहोत.”

खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नफ्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ‘बायजू’ने सुमारे २,५०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. याचदरम्यान कंपनीने जगातील दिग्गज फुटबॉलपटूला आपला ब्रँड अ‍ॅम्‍बेसीडर म्हणून नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बायजू (BYJU’s) कंपनी देशभरातून आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करीत आहे. साधारण ५० हजार कर्मचाऱ्यांपैकी ५ टक्क्यांपर्यंत कर्मचारी कपात कंपनीकडून केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर तिरुअनंतपूरममधील सेंटर बंद करुन बायजू कंपनी येथील १४० कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार होती. पण, केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे कंपनी येथील सेंटर चालू ठेवणार असून आता या १४० कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या भेटीनंतर बायजू (BYJU’s) या कंपनीने केरळमधील आपली सेवा बंद करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयामुळे १४० कर्मचाऱ्यांची जाणारी नोकरी तुर्तास वाचली आहे. नोकरी जाण्याच्या भितीने या कर्मचाऱ्यांनी कामगार मंत्री वी. सिवकुट्टी यांची भेट घेऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. यांनतर घडलेल्या घटनाक्रमानंतर मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बायजू या कंपनीने आपला निर्णय मागे घेतला. कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार बायजूने कोणत्याही पुर्वसूचनेशिवाय आपले टेक्नोपार्क कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

हे ही वाचा :

Back to top button