पिंपरी : पोर्टेबल टॉयलेटचे भाडे 18 लाख रुपये | पुढारी

पिंपरी : पोर्टेबल टॉयलेटचे भाडे 18 लाख रुपये

पिंपरी : शहरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्काम करते. तर, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी शहरातून जाते. या पालखी सोहळ्यास सहभागी होणार्‍या वारकर्‍यांसाठी महाापालिकेच्या वतीने पोर्टेबल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या टॉयलेटचे तब्बल 18 लाख इतके भाडे झाले आहे. दरवर्षी आषाढीवारी सोहळा पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतून पुणे शहरात प्रवेश करतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आकुर्डी विठ्ठल मंदिर येथे मुक्काम करते.

शहरात सायंकाळी येणारी ही पालखी रात्रीचा मुक्काम करून सकाळी दापोडीच्या हॅरिस पुलापासून पुणे शहरात प्रवेश करते. तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी रस्त्यांवरील चर्‍होली, भोसरी, दिघी या शहरातील भागातून जाते. टॉयलेटसाठी आरोग्य विभागाने निविदा राबविली होती. त्यासाठी आलेल्या एकमेव पुरवठादारास काम देण्यात आले. जीआयएस वर्ल्ड हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसने प्रतिदिन 1625 रुपये दराने हे पोर्टेबल टॉयलेट पुरविले. त्या टॉयलेटची स्वच्छता व मनुष्यबळ संबंधित एजन्सीने पुरविले. त्यांच्या भाड्याचा खर्च 17 लाख 85 हजार इतका झाला. त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतीच मंजुरी दिली.

Back to top button