पुणे : कुक्कुटपालकांच्या प्रश्नांवर राज्यस्तरीय समन्वय समिती : राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा | पुढारी

पुणे : कुक्कुटपालकांच्या प्रश्नांवर राज्यस्तरीय समन्वय समिती : राधाकृष्ण विखे-पाटील यांची घोषणा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कुक्कुटपालन व्यवसायातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य असून, त्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कुक्कुटपालक शेतकरी,कुक्कुटपालक कंपन्यांच्या प्रतिनिधींची राज्यस्तरीय समन्वय समिती गठित करण्यात येईल, अशी घोषणा महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

कुक्कु टपालन व्यवसायातील शेतकर्‍यांच्या समस्यांच्या अनुषंगाने विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे गुरुवारी बैठक झाली, त्या वेळी त्यांनी सर्व समस्या ऐकल्यानंतर ही घोषणा केली. बैठकीस आमदार महेश लांडगे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त डी. डी. परकाळे यांच्यासह कुक्कुट व अंडी व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी, राज्यभरातील कुक्कुटपालकांच्या संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.

या वेळी पोल्ट्री व्यावसायिक तसेच कंपन्यांनी आपली भूमिका मांडली. कंपन्यांकडून पुरविण्यात येणारी कुक्कुट पिले, पोल्ट्रीचे खाद्य याची गुणवत्ता तपासणीसाठी शासकीय पशुसंवर्धन महाविद्यालये, नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालय स्तरावर प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी, व्यंकटेश्वरा हॅचरीज, गोदरेज, टायसन आदी कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Back to top button