पिंपळनेर : विरखेल येथे ढगफुटीसदृश्य पावसामुळे सोयाबीनसह शेतीमालाचे नुकसान | पुढारी

पिंपळनेर : विरखेल येथे ढगफुटीसदृश्य पावसामुळे सोयाबीनसह शेतीमालाचे नुकसान

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील विरखेल येथे गुरुवारी, दि.20 पहाटे तब्बल दीड तास पावसाने अक्षरश : झोडपून काढले. ढगफुटी सदृश झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतामध्ये पावसामुळे तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाणी साचल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

गुरुवारी, दि. 20 सकाळी ६ च्या सुमारास पिंपळनेर पासून साधारणत: दहा कि.मी अंतरावर असलेले विरखेलच्या दोन कि.मी. परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यापूर्वीच चार दिवसापासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन बाजरी पिक कापणीवर आली होती. परंतु पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक कापून शेतातच होते. त्यात अस्मानी संकटाने गुरुवारी, दि.20 पहाटे तडाखा दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तयार झालेला सोयाबीन, मका पिकाला अक्षरश: कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे आता काय करावे असा यक्ष प्रश्न उभा शेतकऱ्यांपुढे राहिला आहे. दिवाळी तोंडावर आली असताना हाता-तोंडाशी आलेला खरिपाचे उत्पन्न डोळ्यादेखत निस्तनाबूत  होताना दिसतो आहे. हातचे पिक जात असल्याने शेतकऱ्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. तसेच हतबल होऊन दुसरा पर्याय दिसून येत नसल्याचे सांगण्यात येत असून शासन लक्ष देईल का? असा केविलवाणा प्रश्न विचारत शासनाने व विमा कंपनीने त्वरित मदतीचा हात देवून तातडीने सहकार्य करण्याची आर्त हाक दिली आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी त्यांच्या व्यथा ‘दै.पुढारी’च्या प्रतिनिधीकडे मांडल्या.

 

पिंपळनेर पिक नुकसान www.pudhari.news
पिंपळनेर : विरखेल येथील शेतामध्ये पावसामुळे निर्माण झालेलेी तलावसदृश परिस्थिती. (छाया: अंबादास बेनुस्कर)

हेही वाचा:

Back to top button