नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर महाबौद्ध धम्म मेळावा | पुढारी

नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर महाबौद्ध धम्म मेळावा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा व बीएमए ग्रुप यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिराचे साेमवार, दि. 26 ते दि. 5 ऑक्टोबरपर्यंत गोल्फ क्लब मैदानावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मेळावा व शिबिराची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे.

मेळाव्यानिमित्त संपूर्ण शहरात ठिकठिकाणी झेंडे व फलक लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शिबिराच्या ठिकाणी सभापीठ, मंडप उभारणीसह अन्य व्यवस्थाही पूर्णत्वास आलेली आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक व बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे यांनी दिली. भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 जयंती, धर्मांतर घोषणा वर्धापन दिन आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नगरीत, काळाराम मंदिर सत्याग्रही भूमी तसेच धर्मांतर घोषणेच्या पावनभूमी, भारतात पाचव्या 1 हजार धम्म उपासकांचे महाश्रामणेर शिबिर तसेच महाबौद्ध धम्म मेळावा घेण्यात येत आहे. या शिबिर व मेळाव्यास भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भदंत बोधी पाल, भदंत धम्मरत्न, भदंत सुगत, भदंत आर्यनाग, भदंत शीलरत्न आदींसह देशभरातील भदंत व भिक्खुगण उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रीय आयु, मनोजराजा गोसावी (यवतमाळ) आणि संच यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी प्रमुख मान्यवर व उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आयु. चंद्रबोधी पाटील, भीमराव आंबेडकर, राष्ट्रीय महासचिव शंकरराव ढेंगळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उद्घाटन सोहळा, श्रामणेर दीक्षा प्रारंभ, श्रामणेर प्रशिक्षण, तसेच गोल्फ क्लब ते म्हसरूळ, गोल्फ क्लब ते नाशिकरोड, गोल्फ क्लब ते सातपूर, गोल्फ क्लब ते बौद्ध लेणी या मार्गाने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाबौद्ध धम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिरात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश बनसोड, प्रदीप पोळ, राहुल बच्छाव, भदंत धम्मरत्न, के. के. बच्छाव, गुणवंत वाघ, बाळासाहेब शिरसाठ, अशोक गवई, नितीन मोरे, अरुण काशीद, शिवाजी गायकवाड, वाय. डी. लोखंडे, डी. एम. वाकळे आदी प्रयत्नशील आहेत.

हेही वाचा:

Back to top button