अकोला, पुढारी वृत्तसेवा : विदर्भासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजच्या दोन संचालकपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत विदर्भ मतदारसंघातून अकोल्याचे डॉ. रणजीत सपकाळ तर उर्वरीत महाराष्ट्र मतदारसंघातून बुलडाण्याचे वल्लभराव देशमुख हे विजयी झाले. यामध्ये उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख हे 953 बॅलेटमधून 5 हजार 666 मते घेऊन विजयी झाले. तर विदर्भ मतदारसंघातून डॉ. रणजीत सपकाळ यांना 1339 बॅलेटमधून 8 हजार 962 मते घेऊन विजय झाले. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनय वर्मा यांनी दिली आहे.
महाबीज संचालकपद निवडणुकीचा निकाल असल्याने महाबीज मुख्यालयी उमेदवार त्यांचे समर्थक, प्रतिनिधींची गर्दी होती. विजयी घोषणा देत कार्यकर्ते समर्थकांनी हा परिसर दणाणून सोडला. महाबीजच्या दोन संचालकपदासाठी जुलैमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मतपत्रिका मुख्यालयी आल्यानंतर 15 सप्टेंबरपासून मतपत्रिका छाननी व वैध मतपत्रिकांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. दरम्यान 17 सप्टेंबरला मतपत्रिका ठेवलेल्या हॉलपैकी एका हॉलच्या दरवाज्यावर चिकटवलेले कागदी सील उघडे असल्याचे निदर्शनास आले होते. नंतर या प्रकारावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला होता.
महाबीजच्या निवडणुकीत शेतकरी संचालक म्हणून उर्वरित महाराष्ट्राच्या सर्व भागधारकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. महाबीजच्या इतिहासात सहाव्यांदा संचालक म्हणून निवडून येण्याचा बहुमान मला मिळाला. इतका मोठा विश्वास दाखवल्याबद्दल हा विजय शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचे वल्लभराव देशमुख म्हणाले.
महाबीजच्या निवडणुकीत विदर्भ मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल भागधारकांचे आभार व्यक्त करत महाबीजच्या भविष्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे विजयी उमेदवार डॉ. रणजीत सपकाळ यांनी सांगितले.
हेही वाचा