जळगाव: शिवसेना कार्यालयाच्या आडोशाला जुगार अड्डा | पुढारी

जळगाव: शिवसेना कार्यालयाच्या आडोशाला जुगार अड्डा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील रामेश्वर कॉलनीमध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाच्या आडोशाला जुगार खेळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुढच्या बाजुला शिवसेनेच्या संपर्क कार्यालय आणि मागच्या बाजुला सट्टा मटका खेळला जात होता. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी शहरप्रमुख शोभा चौधरी यांनी सट्टापेढीचा भांडाफोड केला.

जळगावात शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी शोभा चौधरींनी भरवस्तीत सुरू असलेला सट्टा मटका अड्डा उघडकीस आणला आहे. शोभा चौधरी या पूर्वी शिवसेनेत होत्या. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. चौधरी यांच्याच भागात हे शिवसेनेचे संपर्क कार्यालय आहे. आतमध्ये खुलेआम सट्टा मटका सुरु होता. हा मटक्याचा अड्डा ठाकरेंच्या शिवसेनेशी संबंधीत लोक चालवत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. यावरुन आता जळगावात उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे.

पोलिसात गुन्हा दाखल…
शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या जवळच बाळासाहेब ठाकरेंचे बॅनर लावले असून येथे काही लोकांची गर्दी असल्याचे शोभा चौधरी यांना दिसून आले. त्यांनी खात्री केली असता, शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या मागील बाजूस सट्टा सुरू असल्याचे स्पष्ट झाले. शोभा चौधरी यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. याठिकाणी पोलिसांनी त्वरीत कारवाई केली असून अनिल लक्ष्मण माळी (४३, रा. मोठा माळीवाडा, पाळधी खुर्द ता. धरणगाव) याच्यासह सट्टा पेढीमालक जावेद शेख सलीम या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button