

वडगाव मावळ : सद्यस्थितीत जनावरांना होणार्या लम्पी या आजारामुळे शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मावळ तालुक्यातील सर्व पशुपालक शेतकर्यांनी बैलपोळा काळजीपूर्वक साजरा करावा, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. पशुधनावरील लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाच्या उपाययोजना व सद्यस्थितीबाबत आढावा घेऊन आमदार शेळके यांनी हे आवाहन केले. या वेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. पी. देशपांडे, डॉ. अनिल परंडवाल, डॉ. रुपाली दडके, डॉ. अजय सुपे आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार शेळके यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांकडून मावळ तालुक्यातील लम्पी आजाराची सद्यस्थिती, लसीकरण, उपाययोजना याबाबत आढावा घेतला.
बैलपोळा हा शेतकरी आणि बैलांचे जिव्हाळ्याचे नाते घट्ट करणारा सण आहे. आपल्या कृषिप्रधान देशात बैलपोळ्याचा दिवस हा बळिराजासाठी आनंदाची पर्वणी असते. परंतु, लम्पी आजारामुळे पशुधनाची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनांची दखल घेऊन सर्व शेतकरी बांधवांनीदेखील सतर्क राहण्याची गरज आहे. त्यासाठी या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी बैलपोळा काळजीपूर्वक साजरा करावा, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.
तालुक्यात आत्तापर्यंत सुमारे 15 हजार 543 जनावरांचे लसीकरण झाले आहे. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणावर लशीची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे मावळातील लसीकरण मोहिमेला गती देण्यात येणार असून, सर्व पशुपालकांनी जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण त्वरित करून घ्यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.