नाशिक : पावसामुळे घर जमीनदोस्त झाल्याने कुटुंबाची निवार्‍यासाठी आर्त साद | पुढारी

नाशिक : पावसामुळे घर जमीनदोस्त झाल्याने कुटुंबाची निवार्‍यासाठी आर्त साद

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील रहिवाशी बाळू शंकर मुसळे यांचे घर जोरदार पावसामुळे जमीनदोस्त झाल्याची घटना बुधवारी (दि.24) रात्री घडली. संसारोपयोगी वस्तूंसह महत्त्वाची कागदपत्रे मातीच्या ढिगार्‍याखाली गेल्यामुळे मुसळे कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा होऊन आठ दिवस झाले असून अद्यापपर्यंत या कुटुंबीयांना शासनस्तरावरून कुठलीही मदत मिळालेली नाही.

या कुटुंबात बाळू मुसळे वृद्ध आई, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्य करत होते. त्यापैकी एक मुलगा दिव्यांग असून पती-पत्नी दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे घरात कमावणारा कोणीही नाही. परिणामी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपत्तीग्रस्त कुटुंब मारुती मंदिराजवळच्या सार्वजनिक सभागृहात शासकीय मदतीच्या अपेक्षेवर एक एक दिवस काढत आहे. तालुक्याचे आमदार, तहसीलदार तसेच अन्य लोकप्रतिनिधी हेच जनतेचे मायबाप असतात. संकटाच्या काळात त्यांनीच धाऊन येणे गरजेचे असते. परंतु या गरीब कुटुंबांवर मच्छर, अस्वच्छता, पाऊस, उंदीर, घुशी आदींचा सामना करत दिवस काढण्याची वेळ आली आहे. या कुटुंबाला घरकुल तसेच संसारोपयोगी वस्तूंसह किराणा मालाची मदत तातडीने करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

अनेक वर्षांपासून मी व माझी पत्नी दुर्धर आजाराचा सामना करत असून आई वृद्ध असल्याने सतत आजारी असते. तर एक मुलगा अपंग आहे. या घटनेने आयुष्यच संपल्यासारखे वाटते. शासनाकडून काही मदत मिळेल या अपेक्षेने दिवस काढण्याची वेळ आली आहे. शासनाने तातडीने मदत करावी अशी अपेक्षा आहे. – बाळू मुसळे, आपत्तीग्रस्त, नांदूरवैद्य.

हेही वाचा:

Back to top button