सातारा : शाहूनगरीत गणेशभक्‍तांची अलोट गर्दी | पुढारी

सातारा : शाहूनगरीत गणेशभक्‍तांची अलोट गर्दी

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पांचं आगमन होणार असल्याने जनमाणसात उत्साह संचारला आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेसह शहरासह परिसरातील मुख्य रस्त्यांवर गणेशभक्‍तांचा महापूर आला. त्यामुळे पूर्वसंध्येला गणेशभक्‍तांमुळे रस्त्यांना यात्रेचे स्वरूप आले होते. शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठा ओसंडून वाहत होत्या. बाप्पांच्या जयघोषाने अवघे जनजीवन उत्सवमय झाले आहे.

कोरोनानंतर निर्बंधमुक्‍त गणेशोत्सव जल्‍लोषात साजरा करण्यासाठी जिल्हावासीय सज्ज झाले आहे. गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्‍लक असताना पूर्वसंध्येला गणेशभक्‍तांनी बाजारपेठेत तुडुंब गर्दी केली होती. गणेशोत्सवासाठी घरोघरी उत्साहाचे वातावरण असून, त्याअनुषंगाने सर्व तयारी घरोघरी सुरू आहे. गणेशोत्सव जल्‍लोषात साजरा करण्याठी सजावट साहित्यासह विविध वस्तू खरेदीसाठी सातारकर घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातील इतर शहर व ग्रामीण भागही गजबजून गेला आहे.
सार्वजनिक गणेश मंडळासह सर्वच बाप्पांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला बाप्पांच्या प्रतिष्ठापनेच्या तयारीसाठी गणेशभक्‍तांची मांदियाळी उसळली होती. गणेश मूर्ती घरी घेऊन जाणार्‍या गणेशभक्‍तांच्या गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने अवघे जनजीवन आनंदी झाले आहे.

गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपणार असून घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत. गणेशभक्तांची बाप्पांच्या स्वागताची धांदल उडाली आहे. घरोघरी उत्सवाची तयारी सुरू आहे. अनेकांनी आदल्या दिवशीच गणेश मूर्ती नेणे पसंत केले. या मूर्ती घरी नेताना ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आसमंत दणाणत आहे. अवघे जनजीवन उत्सवमय होऊन गेले आहे. घरोघरी उत्सावाचा माहोल निर्माण झाला आहे. गणेश मूर्ती स्टॉलवर बाप्पांच्या आरती व भक्‍तिगीतांचा जागर सुरू होता. त्यामुळे बाजारपेठ गणेशमय होवून गेली होती. सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने ओसंडल्या आहेत. त्यामुळे घरी-दारी व बाजारपेठांमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह संचारल्याचे चित्र आहे.

बाजारपेठेत झगमगाट

गणेशोत्सव ही व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणी असते. उत्सवकाळात बाजारपेठेतील उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढते. आकर्षक साहित्य मांडणी व विविध ऑफर्स ठेवून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर व्यावसायिकांनी आपली दुकाने आकर्षकण विद्युत रोषणाई केली आहे.त्यामुळे सातारा शहरातील बाजारपेठेत सायंकाळच्यावेळी विविधरंगी विद्युत रोषणाईचा झगमगाट डोळ्यांचे पारणे फेडत आहे. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या गणेशभक्‍तांना गणेशोत्स सुरू झाल्याचा प्रत्यय येत होता.

Back to top button