शिंदे गटाचा मुंबईत पक्षबांधणीचा प्रयत्न | पुढारी

शिंदे गटाचा मुंबईत पक्षबांधणीचा प्रयत्न

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात मुंबईसाठी पाच विभागप्रमुख तर तीन विभाग संघटकांवर पक्षबांधणी करण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुंबईतील पदाधिकारी आणि पक्षाचे नवनियुक्त सचिव आणि आमदार यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहात एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत दादर-माहिम वडाळा या विभाग क्रमांक 10 मधून गिरीश धानुरकर यांची विभागप्रमुखपदी तर प्रिया गुरव यांची विभागसंघटकपदी नियुक्ती करण्यात आली. भांडुप, विक्रोळी, मुलुंड या विभाग क्रमांक 7 मधून माजी आमदार अशोक पाटील यांची विभागप्रमुखपदी तर राजश्री मांदविलकर यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबूर, सायन, अणुशक्ती नगर विभाग क्रमांक 9 मधून अविनाश राणे यांची विभाग प्रमुखपदी तर कला शिंदे यांची विभाग संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विभाग क्रमांक 12 मधून दिलीप नाईक यांना विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून विभाग क्रमांक 6 येथून आमदार मंगेश कुडाळकर यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी आमदार प्रकाश सुर्वे यांची दहिसर, बोरिवली, मागाठाणे या विभाग क्रमांक 1 या विधानसभेच्या विभागप्रमुखपदी, आमदार दिलीप लांडे यांची घाटकोपर, चांदिवली असल्फा विधानसभा मतदारसंघाच्या विभागप्रमुखपदी तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची विभाग क्रमांक 11 म्हणजेच भायखळा विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता या नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Back to top button