नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न | पुढारी

नाशिक : त्र्यंबकराजामुळे यंदा एसटीला 58 लाखांचे उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा तिसर्‍या श्रावणी सोमवारसाठी भाविकांसाठी सोडण्यात आलेल्या जादा बसेसमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला घसघशीत 58 लाख 51 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने खर्‍या अर्थाने त्र्यंबकराजा एसटीला पावला आहे.

धार्मिकदृष्ट्या महत्त्व असल्याने श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कोरोनाचे निर्बंध नसल्याने दोन वर्षांनंतर फेरी सुरू झाली. यंदाही भाविकांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाकडून बसेसचे नियोजन करण्यात आले होते. जुने सीबीएस बसस्थानकातून रविवारी रात्रीपासून सोमवारी रात्री उशिरापर्यंत 230 बसेस सोडण्यात आल्या होत्या. सलग दोन दिवसांत या बसेसने 4 हजार 180 फेर्‍या पूर्ण केल्या. लालपरी नाशिक – त्र्यंबकेश्वर मार्गावर सुमारे दीड लाख किलोमीटर धावली. भाविकांनी सलग दोन दिवस लालपरीला विशेष पसंती दिली होती. एक लाख 62 हजार 121 प्रवाशांनी नाशिक – त्र्यंबकेश्वर या मार्गावरील एसटीच्या प्रवासी वाहतूक सेवेला पसंती दिली. या माध्यमातून एसटी महामंडळाच्या तिजोरीत 58 लाख 51 हजार 223 रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा:

Back to top button