नाशिक : कळवण तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण; सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष | पुढारी

नाशिक : कळवण तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण; सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधींकडून दरवर्षी नवीन रस्ते, दुरुस्तीचा बोलबाला केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र, तालुक्यात एकही रस्ता सुस्थितीत नसल्याचे चित्र असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पश्चिम पट्ट्यातील कनाशी – सापुतारा रस्ता खिळखिळा झाला आहे. या रस्त्यावरून शेतकर्‍यांना दळणवळणासाठी विशेषत: गुजरातमध्ये भाजीपाला पाठविण्यासाठी मोठा उपयोग होतो. मात्र, रस्ता दुरवस्थेमुळे वाहन पोहोचण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. वाहनधारकांना मणक्यांच्या आजारांसह वाहन नुकसानीलाही सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. बोरगाव – कनाशी ते अभोणा, हतगड येथील मुख्य रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. याकडेे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

अनेक वर्षांपासून खड्ड्यांची समस्या आहे. एक फुटापर्यंतच्या खड्ड्यांत पाणी साचल्याने अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्याची कामे ठप्प आहेत. – प्रदीप पगार, तालुकाप्रमुख, क्रांतिवीर छावा संघटना.

“रस्त्याने पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेले आहेत. – सतीश पाटील, नागरिक, कळवण.”

हेही वाचा:

Back to top button