नाशिक : खैरनारांच्या शौर्य आणि सन्मानामुळे उंचावली मान, ओझर पुन्हा प्रकाशझोतात | पुढारी

नाशिक : खैरनारांच्या शौर्य आणि सन्मानामुळे उंचावली मान, ओझर पुन्हा प्रकाशझोतात

ओझर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
एचएएलच्या कारखान्यामुळे सार्‍या देशाला माहीत असलेल्या ओझरची मान ओझरपुत्राच्या शौर्य आणि सन्मानामुळे पुन्हा उंचावली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात धाडसी कामगिरीबद्दल सहायक पोलिस निरीक्षक राजरत्न खैरनार यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले असून, ओझरपुत्राच्या या सन्मानाने ओझर पुन्हा प्रकाशझोतात आले आहे.

ओझरचे रहिवासी असलेले राजरत्न खैरनार सध्या सहायक पोलिस निरीक्षक या पदावर कोपरखैरणे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ते 2015 ते 2020 या कालावधीत गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त जिल्ह्यात कर्तव्यावर होते. गडचिरोलीतील अतिदुर्गम अशा भामरागड विभागात नेमणुकीवर असताना त्यांच्या नक्षलवाद्यांशी एकूण पाच चकमकी झाल्या. त्यात 19 एप्रिल 2016 रोजी कुडकेली जंगलातील चकमकीत पोलिस पथकाचे नेतृत्व करत दोन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला व नक्षलवाद्यांची फळी उद्ध्वस्त केली. गडचिरोली जिल्ह्यात नेमणुकीस असताना नक्षल समर्थकांकडून 21 रायफली हस्तगत केल्या व एकूण चार नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. पोलिस पथकाची हानी करण्याकरिता नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या भूसुरुंगाबाबत गोपनीय माहिती काढून सदरचे भूसुरुंग बीडीडीएस पथकाच्या मदतीने जागेवर नष्ट करून पोलिस पथकाची मोठी जीवितहानी टाळली. या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी पोलिस दलातील बहुमानाचे सर्वोच्च असे राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झाले. ओझरकर नागरिकांच्या वतीने त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे.

आदिवासी तरुणांना शिक्षणासाठी प्रोत्साहन
खैरनार यांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करताना परिसरातील आदिवासी मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे. एकीकडे पोलिस कारवाई करताना दुसरीकडे आदिवासींप्रति पोलिस दलाची सामाजिक जबाबदारीही त्यांनी उत्तमरीत्या निभावली आहे. आदिवासी तरुणांना देशाच्या प्रगतीसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी तेथील अनेक गावांत केेलेले आहे.

हेही वाचा :

Back to top button