नाशिक : रात्री आलेल्या रुग्णांना वणी ग्रामीण रुग्णालयाकडून उपचारांसाठी नाशिकला पिटाळण्याचे उद्योग | पुढारी

नाशिक : रात्री आलेल्या रुग्णांना वणी ग्रामीण रुग्णालयाकडून उपचारांसाठी नाशिकला पिटाळण्याचे उद्योग

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

वणीचे ग्रामीण रुग्णालय रेफर केंद्र बनले असून, प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना घाबरवून देण्याचे काम केले जाते. बाळाचे वजन जास्त आहे, यासारखी वेगळी कारणे सांगून खासगी अथवा नाशिकला शासकीय रुग्णालयात पिटाळले जाते आहे.

१६ ऑगस्टला रात्री दहाच्या सुमारास प्रसूती वेदना होत असलेल्या आदिवासी महिलेस वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु तेथे कार्यरत असलेल्या परिचारिकेने संबंधित रुग्णास सिझर करावे लागेल, असे काहीतरी कारण सांगून नाशिकला नेण्याचा सल्ला दिला. या गरोदर महिलेस नातेवाइकांनी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहाटे या महिलेची नैसर्गिक प्रसूती झाली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रात्री त्रास नको म्हणून ते रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याचा आरोप अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, परवाच्या प्रकाराची जिल्हा रुग्णालयाने गंभीर दखल घेतली असल्याचे डाॅ. अनंत पवार यांनी सांगितले. १६ ऑगस्टला रात्री कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

सात वर्षांपासून जैसे थे स्थिती

लोकांची टीका सुरू होताच लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी येऊन चर्चा करतात. येत्या आठवड्यात सर्व सुरळीत होईल, असे सांगून वेळ मारून नेण्याचे काम मागील सात वर्षांपासून सुरू आहे. केंद्रीय मंत्री डाॅ. भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यापूर्वी अनेक वेळा या संदर्भात बैठका घेऊनही ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती कधीच सुधारली नाही.

मी फोपशी शिवारात राहतो. १६ ऑगस्टला रात्री पत्नीला प्रसूती वेदना होऊ लागल्याने आम्ही तिला वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डाॅक्टर, परिचारिकेने साधी तपासणी केली नाही. सोनोग्राफीचे चित्र पाहून सिझर करावे लागेल, असे सांगून नाशिकला घेऊन जाण्याचा सल्ला दिला. संबंधित डाॅक्टर व परिचारिकेवर हलगर्जीपणाबद्दल कारवाई केली पाहिजे. – हंसराज झिरवाळ, रुग्णाचे नातेवाईक, फोपशी.

वणी ग्रामीण रुग्णालयात १६ ऑगस्टला झालेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधित वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेवर कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे असे प्रकार घडणार नाही. डाॅ. अनंत पवार, आरएमओ, नाशिक जिल्हा रुग्णालय.

हेही वाचा:

Back to top button