‘मविआ’चे जाता जाता आमदारांना गिफ्ट ; मतदारसंघ निधीत 1 कोटींची वाढ | पुढारी

‘मविआ’चे जाता जाता आमदारांना गिफ्ट ; मतदारसंघ निधीत 1 कोटींची वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने 10 दिवसांच्या राजकीय नाट्यावर पडदा पडला आहे. पण सरकारने जाण्यापूर्वी मतदारसंघ निधीत 1 कोटी रुपयांची भरघोस वाढ करत राज्यातील आमदारांना गिफ्ट दिले आहे. या निर्णयामुळे आमदार निधीची रक्कम 5 कोटींवर पोहोचली आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत ‘मविआ’चे सरकार पायउतार झाले. परंतु, या सरकारने जाण्यापूर्वी अनेक निर्णय घेतले. त्यामध्ये नवी मुंबई विमानतळ तसेच औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतरणाचा समावेश आहे. त्यासोबत राज्यातील विधानसभेच्या 287 व विधान परिषदेच्या 78 आमदारांच्या मतदारसंघ निधीत मविआ सरकारने 4 कोटींवरून पाच कोटींपर्यंत वाढ केली आहे. आमदारांच्या निधीसंदर्भात सर्वप्रथम मागील पंचवार्षिकमध्ये वाचा फुटली. मतदारसंघाचा वाढता पसारा व निधीची कमतरता याचा ताळमेळ जमविताना दमछाक होते. त्यातच अपूर्ण निधीमुळे मतदारांच्या मागण्या पूर्ण करता येत नसल्याच्या तक्रारी आमदारांनी थेट अधिवेशनात मांडल्या. त्यावेळी तक्रारींची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आमदारांच्या निधीत 2 कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढ केली. दरम्यान, 2019 नंतर राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मविआचे सरकार स्थापन झाले. या सरकारने 2020 मध्ये आमदार निधीत 1 कोटींची वाढ करत तो चार कोटी केला. तर दोनच दिवसांपूर्वी सरकारने नवीन आदेश काढत हाच निधी 5 कोटी रुपये केला आहे. ‘मविआ’च्या या निर्णयाचे सर्वपक्षीय आमदारांकडून स्वागत केला जात आहे.

आमदार आता खासदारांच्या पंक्तीत
खासदारांना दरवर्षी मतदारसंघाच्या विकासासाठी 5 कोटींचा निधी केंद्र सरकार देते. त्यानुसार पाच वर्षांत खासदारांना 25 कोटींचा निधी खर्चास मिळतो. त्या धर्तीवर आम्हालाही 5 कोटी उपलब्ध करून देण्याची आमदारांची मागणी होती. मविआ सरकारने ही मागणी पूर्ण केल्याने निधीबाबत आमदार आता खासदारांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.

हेही वाचा :

Back to top button