कोल्हापूर : डॉक्टरांवर हल्ल्याचा प्रयत्न; 7 जणांवर गुन्हा | पुढारी

कोल्हापूर : डॉक्टरांवर हल्ल्याचा प्रयत्न; 7 जणांवर गुन्हा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील डॉ. वसीम मेहबूब मुल्‍ला (वय 40, रा. श्रीनिवास अपार्टमेंट, शाहूपुरी) यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मिरज व इचलकरंजी येथील 7 जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 27 मार्चला घडलेल्या घटनेची तीन महिन्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

रफिक अहमद रसूल पटेल, मुलगी अलमास रफिक पटेल, मुलगा जहूर अहमद पटेल, अजमल पटेल (रा. बळवंतराव मराठे हायस्कूलजवळ, मिरज), अभिनंदन खोत (सांगली), वसीम शेख, श्रीकांत पाटील ( इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयितांना लवकर अटक करण्यात येईल, असे ‘शाहूपुरी’ चे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.

रफिक पटेल यांची कन्या अलमास यांच्याशी डॉ. मुल्‍ला यांचा 2011 मध्ये विवाह झाला होता. दाम्पत्यांना एक अपत्यही आहे. कौटुंबिक कारणातून मतभेदानंतर 2018 मध्ये घटस्फोट झाला. 2020 मध्ये डॉ. मुल्‍ला यांनी इस्लामपूर येथील तरुणीशी विवाह केले.

27 मार्च 2022 मध्ये रात्री डॉक्टर ड्युटीवरून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शिवीगाळ करून हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 31 मार्चला रात्री उशिरा दोन अनोळखी व्यक्‍तींनी ’ तुला सोडणार नाही’ अशी धमकी देत पाठलागही केला. तलवार व रॉडने हल्ल्याचा प्रयत्न केला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. रफिक पटेल व अन्य संशयितांच्या चिथावणीमुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले
आहे.

Back to top button