नगर : गटाचं ठरलं; आता आरक्षणाचे डोहाळे! जिल्हा परिषदेच्या 85 गटांमध्ये कुतूहल | पुढारी

नगर : गटाचं ठरलं; आता आरक्षणाचे डोहाळे! जिल्हा परिषदेच्या 85 गटांमध्ये कुतूहल

नगर : पुढारी वृत्तसेवा: आगामी जिल्हा परिषदेची 85 आणि पंचायत समित्यांच्या 170 गणांची अंतिम रचना झाल्यानंतर, आता इच्छुकांना आरक्षण सोडतीचे डोहाळे लागले आहेत. येत्या 10 जुलै दरम्यान आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, फिरत्या आरक्षणाचा अभ्यास करून गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांसाठी जागा होत्या, तेथे यावेळी ‘तेच’ आरक्षण पडणार नाही, असा अंदाज बांधून ‘सर्वसाधारण’ इच्छुकांनी तयारीला वेग दिला आहे.

गेल्या निवडणुकीत 73 गट आणि 146 गण होते. यावेळी नवीन 12 गट आणि 24 गणांची भर पडली आहे. दोन दिवसांपूर्वीच गट-गणांची अंतिम रचना कायम झाली आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांच्या नजरा आता आरक्षणाकडे खिळल्या आहेत. यामध्ये ओबीसींशिवाय या निवडणुका होणार असल्याने त्या जागा आता सर्वसाधारणसाठी वाढणार आहेत. शिवाय अनुसूचित जाती व जमातीचेही आरक्षणही वाढले आहे. त्यात लोकसंख्येनुसार नव्याने आरक्षण टाकले जाणार आहे.

गत पंचवार्षिक निवडणुकीत ओबीसींसाठी 20 गट राखीव होते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 37 गट होते. अनुसूचित जातीसाठी 9, जमातीसाठी 7 जागा राखीव होत्या. ओबीसी जागा रद्द झाल्याने आता सर्वसाधारण जागा वाढणार आहे. त्यामुळे 85 गटांपैकी 50 टक्के प्रमाणे 43 जागा महिलांसाठी आरक्षित असतील. गेल्यावेळी 17 जागांवर महिला लढल्या, त्यात यावेळी 26 जागांची भर पडणार आहे. एकूणच अनुसूचित जातीसाठी 10 आणि जमातीसाठी 8 जागा होऊ शकतात. तर, सर्वसाधारणसाठी 67 जागा असतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

गेल्या निवडणुकीत ‘या’ नेत्यांची कोंडी!
गत पाच वर्षांपूर्वी झालेल्या आरक्षण सोडतीत तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अनेक दिग्गजांची कोंडी झाली होती. यात तत्कालीन अध्यक्षा मंजूषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाबासाहेब दिघे, नंदा वारे, मीरा चकोर यांचे गट आरक्षित झाले होते. तर, अ‍ॅड. सुभाष पाटील, बाळासाहेब हराळ, संभाजी दहातोंडे आदींचे गट महिलांसाठी राखीव झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे यंदाच्या आरक्षणात आपलीही कोंडी होऊ नये, यासाठी अनेक इच्छुक देव पाण्यात बुडवून आहेत.

मागील निवडणुकीतील आरक्षण आणि सदस्य

सोनाली रोहमारे (ओबीसी महिला, चांदेकासारे), दीपाली गिरमकर (सर्वसाधारण महिला, आढळगाव), अनुराधा नागवडे (सर्वसाधारण महिला, बेलवंडी), (स्व) सदाशिव पाचपुते (सर्वसाधारण, काष्टी), गुलाब तनपुरे (सर्वसाधारण, मिरजगाव), सुनीता खेडकर (ओबीसी महिला, कोरेगाव), उमेश परहर (अनुसूचित जाती, कुळधरण), कांतीलाल घोडके (अनुसूचित जाती राशिन), वंदना लोखंडे (अनुसूचित जाती महिला, खर्डा), सोमीनाथ पाचरणे (अनुसूचित जाती, जवळा), (स्व) शिवाजी गाडे (ओबीसी, बारागाव नांदूर), शशिकला पाटील (सर्वसाधारण महिला, वांबोरी), सुप्रिया झावरे (सर्वसाधारण महिला, ढवळपुरी), उज्ज्वला ठुबे (सर्वसाधारण महिला, कान्हूर पठार), काशिनाथ दाते (ओबीसी, ढाकळीढोकेश्वर), राणी लंके (सर्वसाधारण महिला, सुपा), पुष्पा वराळ (सर्वसाधारण, निघोज), कोमल वाखारे (ओबीसी महिला, येळपणे), ताराबाई पंधरकर (सर्वसाधारण महिला, कोळगाव), सुवर्णा जगताप (सर्वसाधारण महिला, मांडवगण), प्रताप शेळके (ओबीसी, देहेरे), भाग्यश्री मोकाटे (ओबीसी महिला, जेऊर), संदेश कार्ले (ओबीसी, दरेवाडी), माधवराव लामखडे (सर्वसाधारण, निंबळक), अनिता हराळ (सर्वसाधारण महिला, वाळकी), जनाबाई पैसे (अनुसूचित जमाती महिला, टाकळीमियाँ), महेश सूर्यवंशी (अनुसूचित जमाती, ब्राम्हणी), नंदा गाढे (सर्वसाधारण महिला, सात्रळ), सुरेखा साळवे (अनुसूचित जाती महिला, सोनई), सविता आडसुरे (ओबीसी महिला, चांदा), राजश्री घुले (सर्वसाधारण महिला, दहिगावने), संगीता दुसूंगे (अनुसूचित जाती महिला, बोधेगाव), हर्षदा काकडे (सर्वसाधारण, लाडजळगाव), रामभाऊ साळवे (अनुसूचित जाती, भातकुडगाव), राहुल राजळे (सर्वसाधारण, कासार खरवंडी), प्रभावती ढाकणे (सर्वसाधारण, भालगाव), संध्या आठरे (ओबीसी महिला, माळी बाभुळगाव), (स्व) अनिल कराळे (ओबीसी, मिरी), ललिता शिरसाट (ओबीसी महिला, टाकळी मानूर), शालिनीताई विखे पाटील (ओबीसी महिला, लोणी खु), दिनेश बर्डे (अनुसूचित जमाती, कोल्हार बु), मंगल पवार (अनुसूचित जमाती महिला, उंदिरगाव), आशा दिघे (सर्वसाधारण, दत्तनगर), शरद नवले (सर्वसाधारण, बेलापूर खु), दादासाहेब शेळके (सर्वसाधारण, बेलपिंपळगाव), तेजश्री लंघे (ओबीसी महिला, कुकाणा), दत्तात्रय काळे (ओबीसी, भेंडा बु), मीना शेंडे (अनुसूचित जाती महिला, भानसहिवरे), सुनील गडाख (ओबीसी, खरवंडी), रामहरी कातोरे (ओबीसी, धांदरफळ बु), मिलिंद कानवडे (ओबीसी, संगमनेर खु), अजय फटांगरे (ओबीसी, बोटा), मीरा शेटे (सर्वसाधारण महिला, साकूर), सुधाकर दंडवते (सर्वसाधारण, सुरेगाव) विमल आगवण (सर्वसाधारण महिला, ब्राम्हणगाव), सोनाली साबळे (अनुसूचित जाती महिला, वारी), राजेश परजणे (सर्वसाधारण, शिंगणापूर), शाम माळी (अनुसूचित जमाती, पुणतांबा), कविता लहारे (ओबीसी महिला, वाकडी), पुष्पा रोहम (सर्वसाधारण महिला, साकुरी), जालिंदर वाकचौरे (सर्वसाधारण देवठाण), कैलास वाकचौरे (सर्वसाधारण, धामगाव आवारी), सुनिता भांगरे (सर्वसाधारण महिला, राजुर), किरण लहामटे (सर्वसाधारण, सातेवाडी), रमेश देशमुख (सर्वसाधारण, कोतूळ), भाऊसाहेब कुटे (सर्वसाधारण, समनापूर), महेंद्र घोडगे (सर्वसाधारण, वडगावपान), रोहिणी निघुते (सर्वसाधारण महिला, आश्वी बु), शांता खैरे (अनुसूचित जमाती महिला, जोर्वे), सीताराम राऊत (सर्वसाधारण, घुलेवाडी) आदी.

Back to top button